भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सत्तेपासून दूर असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर शिवसेनेने बोचरी टीका केली आहे. राजकारणात जे पेरावे तेच उगवते त्याचाच अनुभव खडसे सध्या घेत असल्याचे ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटले आहे. शिवसेनेशी युती तोडल्याचा खडसे यांनी आनंद व्यक्त केला. पण या आनंदावर खूप लवकर विरजण पडेल असे खडसेंनाही वाटले नसेल, असा टोलाही त्यात हाणला आहे.
सत्तेपासून दूर झाल्यामुळे खडसे यांना हे सरकार आपले वाटत नाही. त्यामुळे ते ‘तुमचे सरकार’ असा जाहीर कार्यक्रमातून उल्लेख करतात. त्यामुळे त्यांनी तपस्येतून विरक्तीकडे.. असा नवा मार्ग तर शोधला नाही ना असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
जमीन घोटाळा, दाऊद इब्राहिमशी संबंध व इतर आरोपांवरून खडसे यांना मंत्रीपदावरून जावे लागले. त्यामुळे फक्त २४ तासांत खडसे होत्याचे नव्हते झाले. ज्या पक्षात ४० वर्षांत फुले वेचली तिथे गोवर्‍या वेचण्याची वेळ खडसेंवर आली आहे. पक्षाने प्रसारमाध्यमांवर विश्वास ठेऊन आपल्याला मंत्रिपदावरून पायउतार होण्यास सांगितल्याची खंत एका जाहीर कार्यक्रमात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासमोर व्यक्त करत ‘तुमचे सरकार’ असा उल्लेख त्यांनी केला. असे म्हणून ते तपस्येतून विरक्तीकडे निघाले आहेत काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
योग्य वेळी तोंड उघडून देशात भूकंप घडवू असे म्हणणारे खडसे यांचा बॉम्बगोळा फुटून भूकंप काही होत नाही. खडसे यांना घरातीलच स्वकीयांची दृष्ट लागली व ४० वर्षांत त्यांनी कमावलेले पाचोळासारखे उडून गेल्याचे उपहासात्मकपणे म्हटले आहे.
खडसेंना निर्दोष ठरवणारी स्वतंत्र यंत्रणा आहे व ही यंत्रणा राजकीय हुकमाने काम करते. याबाबत खडसे यांना सांगण्याची गरज नाही. सुरेश जैन यांना साडेचार वर्षे तुरूंगात का सडवले गेले याचे उत्तर खडसे यांना माहीत आहे. खडसे यांच्या वाढदिवसादिवशीच जैन यांची सुटका होणे हा योगायोग समजून घेण्याची गरज असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. खडसे यांनी ४० वर्षांत राजकारणात जे पेरले त्याचीच फळ भोगत आहेत. खडसे यांना हे सरकार आपले वाटत नाही. तुमचे सरकार असे ते म्हणतात. तपस्येतून विरक्तीकडे असा नवा मार्ग त्यांनी शोधला आहे काय? असा सवाल सेनेने विचारला आहे.