मुंबई : विविध कारणांनी मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या कूपर रुग्णालयात आता औषधांचा तुटवडा निर्माण झाला. मागील सहा महिन्यांपासून रुग्णालयात प्रतिजैविके, घशाला खवखव, पित्ताशी संबंधित औषधे, वेदनाशामक औषधांबरोबरच मानसोपचार व श्वानदंशावरील औषधेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खासगी औषधालयातून औषधे विकत घ्यावी लागत असल्याने त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर कूपर रुग्णालयाच्या मागील शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव घेत नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर उंदीरांनी रुग्णांचा घेतलेला चावा, त्यानंतर रुग्णालयातील अस्वच्छता, पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अशा एका पाठोपाठ एक घटना अवघ्या काही दिवसांत घडल्याने मुंबई महानगरपालिकेचे कूपर रुग्णालय चर्चेत आहे. कूपर रुग्णालयाचा अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविलेल्या डॉ. नीलम अंद्राडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये १०० पेक्षा जास्त नस्ती मंजूर केल्याचे सांगून यापुढे कूपरचा कारभार सुरळीत चालेल अशी ग्वाही दिली होती.
मात्र कूपर रुग्णालयात मागील काही दिवसांपासून औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचे उघडकीस आले आहे. बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांकडून उपचार मिळत आहेत, पण रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने माघारी जावे लागत आहे. रुग्णांना खासगी औषधालयातून औषधे विकत घ्यावी लागत आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना प्रतिजैविके, घशाला खवखव, पित्ताशी संबंधित औषधे, वेदनाशामक औषधांबरोबरच मानसोपचार व श्वानदंशावरील औषधे मिळत नाहीत. श्वानदंश झालेले रुग्ण आल्यास त्याला केवळ धनुर्वाताचे इंजेक्शन दिले जाते. मात्र एआरव्ही व एचआरआयजी ही दोन औषधे रुग्णांना खासगी औषधालयातून विकत घेण्यास सांगितले जाते. यातील एआरव्ही हे इंजेक्शन ६०० रुपये तर एचआरआयजी हे इंजेक्शन सात हजार रुपयांना मिळते. मानसिक उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनाही औषधे मिळत नाहीत. त्याचबराेबर डायक्लोफिनॅक, पॅन्टोप्रोझोल, ऑगमेंटीन, ॲझिथ्रोमायसिन, जेलोसिल ही सामान्यपणे अनेक दुखण्यांवर देण्यात येणारी औषधेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णालयमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला खासगी औषधालयाकडे धाव घ्यावी लागत आहे.
मध्यवर्ती खरेदी खात्याकडून रुग्णालयासाठी लागणाऱ्या औषधांच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरपर्यंत सर्व औषधे रुग्णांना उपलब्ध होतील. – डॉ. देव शेट्टी, वैद्यकीय अधीक्षक, कूपर रुग्णालय