मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी मुंबईनगरी सज्ज झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रॉफ बिल्डिंगमधून गणरायावर होणाऱ्या पुष्पवृष्टीचा सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्यासाठी गर्दी उसळणार आहे. विशेष बाब म्हणजे यंदा श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाने ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित पुष्पवृष्टी तयार केली असून राफेल या लढाऊ विमानाची प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहे.
लालबागमधील श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळातर्फे १९७० पासून अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेशमूर्तींवर गुलाल व फुलांचा वर्षाव करीत गणरायाला सलामी दिली जाते. श्रॉफ बिल्डिंगमधील रहिवाशांनी एकत्र येत पुष्पवृष्टी सोहळ्याची सुरुवात केली. दरवर्षी विविध संकल्पनांवर आधारित पुष्पवृष्टी करण्यात येते आणि ५०० हून अधिक गणेशमूर्तींवर गुलाल व फुलांचा वर्षाव होतो.
जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटक नागरिकांना प्राण गमवावे लागले, त्यानंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना मानवंदना देण्यासाठी यंदा श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाने ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित पुष्पवृष्टी तयार केली आहे. यासाठी राफेल या लढाऊ विमानाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. विविध कामांची विभागणी करून श्रॉफ बिल्डिंगमधील रहिवाशांनी पुष्पवृष्टी साकारली आहे.
विशेष बाब म्हणजे पुष्पवृष्टी होताना विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचा जयघोष करण्यात येणार आहे. तसेच राफेल या लढाऊ विमानाची प्रतिकृती सरकताना अनुषंगिक साऊंड व इतर इफेक्ट देण्याचाही मंडळाचा प्रयत्न असणार आहे.
‘श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी सोहळ्याला शनिवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सुरुवात होणार असून रात्री २ वाजेपर्यंत पुष्पवृष्टी सुरू राहण्याची शक्यता आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह काही घरगुती गणेशमूर्तींवरही पुष्पवृष्टी करण्यात येते. या पुष्पवृष्टी सोहळ्याच्या निमित्ताने श्रॉफ बिल्डिंगमधील जुने व नवीन रहिवासी, तसेच त्यांचे नातेवाईक एकत्र येतात. एकूण १ हजार ते १ हजार ५०० रहिवासी हा सोहळा एकत्र अनुभवतात’, असे श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाचे अध्यक्ष जनार्दन वालावलकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
१ हजार किलो फुले आणि ४०० किलो गुलाल

श्रॉफ बिल्डिंगतर्फे दरवर्षी पुष्पवृष्टीसाठी ७०० ते ७५० किलो फुलांचा वापर केला जातो, यंदा ९५० ते १ हजार किलो फुलांचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये झेंडूच्या फुलांसह गुलाबाच्या पाकळ्यांचा समावेश आहे. तसेच ३५० ते ४०० किलो गुलालाचा वापर करण्यात येणार आहे. फुलांच्या पाकळ्या आणि गुलाल एकत्र करून गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टीच्या माध्यमातून सलामी दिली जाणार आहे.