Siddhivinayak Temple Beautification Project: प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाढीव सुविधा देण्याकरीता राज्य सरकारच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने विशेष प्रकल्प हाती घेतला असून यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. सुमारे ७८ कोटींच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिर भारतातील प्रमुख देवस्थानांपैकी एक धार्मिक स्थळ आहे. सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी या मंदिरात जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात. अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते, अभिनेत्री, उद्योजक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.

मात्र अत्यंत गजबजलेल्या या परिसरात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे मंदीर परिसराचा कायापालट करण्याचा प्रकल्प महापालिका प्रशासनाने हाती घेतला आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागरी मार्गाच्या एका मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात सिद्धीविनायक मंदिराच्या प्रकल्पाची घोषणा केली होती. तसेच या प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपये निधी देण्याचीही घोषणा केली होती.

या प्रकल्पांतर्गत सिद्धीविनायक मंदिर परिसराचे सुशोभिकरण आणि पुनर्नियोजन करण्यात येणार आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण, सुशोभिकरण, पूजा साहित्य विक्रेत्यांची बसण्याची व्यवस्था अशा कामांचा यात समावेश आहे. या कामाचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. सल्लागारांनी सुचवल्यानुसार आता मुंबई महापालिकेने पहिल्या टप्प्यातील कामांसाठी निविदा मागवल्या आहेत.

कोणती कामे करणार

पहिल्या टप्प्यात भूमिगत वाहनतळ, मंदिराचे प्रवेशद्वार, लादीकरण, छताचे काम, संरक्षक भिंत आदी कामे केली जाणार आहेत. भूमिगत दोन तळमजल्यांचे वाहनतळ तयार करण्यात येणार आहे. या कामांचा अंदाजित खर्च ७८ कोटी रुपये असून या कामासाठी मुंबई महापालिकेने आता निविदा मागवल्या आहेत.

प्रकल्पावर निर्णयासाठी समिती

प्रकल्प व्यवस्थापक सल्लागारांनी दिलेल्या विस्तृत अहवालावर निर्णय घेण्यासाठी पालिकेच्या परिमंडळ २ चे उपायुक्त आणि सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. यात मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त, जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त, पालिकेचे वास्तुविशारद, पालिकेच्या विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता, रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता, नगर उप अभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

प्रकल्पामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश

  • मंदिरात भाविकांना येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता तयार करणे
  • मंदिराच्या दोन्ही मार्गावर प्रवेशद्वार बनवणे
  • भाविकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारणे
  • दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना तात्पुरती बसण्याची व्यवस्था करणे, छत तयार करणे
  • मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करणे
  • भाविकांसाठी वाहनतळाची व्यवस्था करणे
  • सुरक्षिततेसंबंधी उपाययोजना करणे
  • नवीन मेट्रो स्थानकापासून मंदिराकडे येणाऱ्यांसाठी सुविधा तयार करणे
  • दादर स्थानकापासून मंदिराकडे येण्यासाठी दर पाच मिनिटांनी बेस्टची मिनीबस चालवणे