मुंबई : महाराष्ट्रातून संसर्गजन्य आजारांचे संपूर्ण उच्चाटन व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल कार्यक्रमांतर्गत कार्य करत असलेल्या संस्थांना आवाहन केले होते. या आवाहनाला गोदरेज कन्झ्युमर्स कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि गोदरेज कंझ्युमर्स यांचे एक विशेष कृती दल तयार करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे संपूर्ण राज्यात संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी सुसंगत, वैज्ञानिक आणि सर्वसमावेशक आराखडा तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया नियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या एम्बेड प्रकल्पाअंतर्गत महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये आणि विशेषतः गडचिरोलीत या उपक्रमाने लक्षणीय यश मिळवले आहे.

संसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी व्यवस्थापन

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गोदरेज कंन्झुमर प्रॉडक्ट्सच्या एम्बेड प्रकल्पांतर्गत या संसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी व्यवस्थापन करण्यात येत आहे. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या आजाराचे योग्य निदान व्हावे यासाठी ४०० हून अधिक वैद्यकीय अधिकारी, सामान्य चिकित्सक व बालरोगतज्ज्ञांना आधुनिक उपचार पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय १८० प्रयोगशाळा निरीक्षण अधिकारी व १६५ कीटकशास्त्रज्ञांना (एन्टोमॉलॉजिस्ट) प्रशिक्षण देऊन रोग निदान आणि प्रतिबंधन अधिक सक्षम करण्यात आले आहे. त्याचबरोबर गडचिरोली, नाशिक, सातारा, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये तातडीने तपासणी मोहीम राबवली गेली. साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव झालेला शहरी भाग आणि आदिवासी भागांमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले गेले.

समुदाय पातळीवर जागरूकता मोहीम, गृहभेटी

संसर्गजन्य आजाराची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व गोदरेज कन्झ्युमर कंपनीने समुदाय पातळीवर जागरूकता मोहीम, गृहभेटी यासारख्या विविध योजना राबविल्या आणि आरोग्य व पोषण दिनांच्या माध्यमातून नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले. या उपक्रमातून १ लाखांहून अधिक घरांना भेटी देण्यात आल्या. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातच ५२ हजारांहून अधिक लोकांना याचा थेट लाभ मिळाला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग व गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टच्या या एम्बेड प्रकल्पामुळे राज्यात २०२४ मध्ये डेंग्यू मृत्यूंची संख्या २७ टक्क्यांनी घटली असून तपासण्यांचे प्रमाण १३ टक्क्यांनी वाढले आहे. त्याचबरोबर मलेरियाच्या तपासण्यात वाढ करून लवकर निदान आणि उपचार करण्यात येत आहे. भविष्यात आजाराची जलद तपासणी आणि तत्काळ उपचार होण्यास गती मिळणार आहे.