मुंबई : स्तनाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना सर्वसामान्य रुग्णांसाठी मोठे आव्हान आहे. आर्थिक ताण, उपचारांची गुंतागुंत आणि मानसिक दबाव यामुळे रुग्ण व नातावेईक प्रचंड तणावाखाली असतात.अशा वेळी ठाणे जिल्हा रुग्णालयाने ब्रेस्ट कॅन्सरचे आव्हान स्वीकारत एका ७८ वर्षीय महिलेची स्तन कर्करोगाची गाठ यशस्वीरीत्या काढून जीव वाचवण्यात मोठे यश मिळवले आहे.

ठाण्यात एका मॅमोग्राफी स्क्रिनिंग व्हॅनमध्ये तपासणीदरम्यान या वृद्ध महिलेच्या स्तनात संशयित गाठ आढळली. त्वरित तिला सिव्हिल हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये दाखल करण्यात आले. अचानक झालेल्या या निदानामुळे कुटुंबीय अस्वस्थ झाले. त्या महिलेच्या वयाचा विचार करता हा आजार धोकादायक ठरू शकतो, असे संबंधितांचे म्हणणे पडले.मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी समुपदेशन देत कुटुंबीयांना धीर दिला. यानंतरच्या इमेजिंग तपासण्या आणि कोर नीडल बायोप्सीमध्ये तिच्या डाव्या स्तनात डक्टल कार्सिनोमा इन सिटू असल्याची पुष्टी झाली. वयोमान लक्षात घेता उपचार अधिक दक्षतेने करण्याची गरज होती. मल्टिडिसिप्लिनरी टीमच्या चर्चेनंतर ब्रेस्ट कंझर्व्हेशन सर्जरी (लम्पेक्टॉमी) करण्याचा निर्णय घेण्यात आला.यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली.ब्रेस्ट ऑन्को-प्लॅस्टिक सर्जन डॉ. रितिका भंडारी यानी पेरिअरीओलर इनसिजन तंत्राचा वापर करून कर्करोगग्रस्त भाग सुरक्षितपणे काढला. तसेच प्लास्टिक सर्जरीची जोडही देण्यात आल्याचे डॉ. रितिका भंडारी यांनी सांगितले.यावेळी भूल देण्याचे काम भूततज्ज्ञ डॉ प्रियांका महांगडे यांनी केले.

राज्यात वर्षानुवर्षे वाढणाऱ्या स्तन कर्करोगाच्या घटनांकडे पाहता नियमित स्तन तपासणी, आरोग्य जागरूकता आणि प्राथमिक निदान सुविधा वाढविणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. त्यासोबतच शासकीय रुग्णालयांमधील शस्त्रक्रिया पायाभूत सुविधा वाढल्यास सामान्य महिलांनाही उपचाराचा खर्च परवडणारा आणि सहज उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा रुग्णालयातील स्तनकर्करोगाची शस्त्रक्रिया एक महत्त्वाचे योगदान म्हणावे लागेल.

मल्टिडिसिप्लिनरी टीमच्या चर्चेनंतर ब्रेस्ट कंझर्व्हेशन सर्जरी (लम्पेक्टॉमी) करण्याचा निर्णय घेण्यात आला.पेरिअरीओलर इनसिजन तंत्राचा वापर करून कर्करोगग्रस्त भाग सुरक्षितपणे काढण्यात आला.आता वृद्ध महिलेची प्रकृती आता स्थिर असून ठाणे जिल्हा रुग्णालयातील ही दुसरी ब्रेस्ट कॅन्सर शस्त्रक्रिया आहे. सुमारे दहा महिन्यांपूर्वी आम्ही रुग्णालयात कॅन्सर रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापूसन आतापर्यंत एकूण पाच शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी सांगितले.

देशात स्तन कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, याचा सर्वाधिक फटका ३५ ते ५५ वयोगटातील महिलांना बसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. २०२४ सालासाठी देशातील अंदाजित नवीन स्तन कर्करोग रुग्णसंख्या तब्बल २.२७ लाखांवर पोहोचली आहे. गेल्या दशकात या आजाराचे प्रमाण सातत्याने वाढत असून, पुढील काही वर्षांत दरवर्षी किमान पन्नास हजारांनी या रुग्णसंख्येत वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.भारतात उशिरा निदान होणे, तपासण्यांची उपलब्धता कमी असणे आणि आर्थिक अडचणी अशी अनेक कारणे या वाढत्या संकटाला कारणीभूत ठरत आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भागात तर स्तन तपासणी व मॅमोग्राफीसारख्या मूलभूत सुविधा अद्याप मर्यादित प्रमाणातच उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच राज्यातील कर्करोग उपचार व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ‘महाकेअर’ ही स्वतंत्र फाउंडेशन स्थापन केली आहे. या धोरणांतर्गत १८ रुग्णालयांना तीन स्तरांमध्ये (एल १,एल २,एल ३) विभागून कर्करोग निदान, शस्त्रक्रिया, कीमोथेरपी, रेडिओथेरपी आणि पॅलिएटिव्ह केअर आदी सेवा अधिक सक्षमपणे उपलब्ध होणार आहेत.मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालय हे अॅपेक्स केंद्र (एल १) म्हणून कार्य करणार असून, नागपूर, चंद्रपूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर अशा आठ केंद्रांमध्ये एल २ प्रगत निदान व शस्त्रक्रिया सुविधा उभारल्या जात आहेत. तर अंबाजोगाई, नांदेड, यवतमाळ, सातारा, जळगाव, रत्नागिरी, बारामती, मुंबईतील कामा रुग्णालय आणि शिर्डी येथे नऊ केंद्रांद्वारे एल ३ प्राथमिक कर्करोग सेवा पुरवली जाणार आहेत.यासाठी शासनाने मोठ्या निधीची व्यवस्था केली असून त्यातून अत्याधुनिक उपकरणे, ऑपरेशन थिएटर, मॅमोग्राफी मशीन, बायॉप्सी सुविधा आणि प्रशिक्षित विशेष वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होणार आहेत.राज्यातील प्रत्येक केंद्राशी ‘कमांड अँड कंट्रोल’ प्रणालीद्वारे समन्वय साधला जाणार असून, त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाही वेळेवर तज्ज्ञ सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.