मुंबई: राज्यातील पूरग्रस्तांसाठी साखर कारखान्यांच्या नफ्यातून प्रतिटन ५ रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीत १० रुपये घेतले जाणार असल्याचा दावा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी यांनी बुधवारी केला. शिवसेना(ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडूनच पैसे घेतले जाणार असल्याचा आरोप केला होता. त्यावरुन शेलार यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
आजवर बिल्डर, कंत्राटदार यांचा कैवार घेणारे उद्धव ठाकरे आता कारखानदारांच्या बाजूने बोलू लागले असून माजी मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांना एवढे तरी माहित असायला हवे की, मुख्यमंत्री सहायता निधीत साखर कारखान्यांकडून प्रतिटन ५ रुपये योगदान हे वर्षानुवर्षे घेतले जात आहेत. यावर्षी त्यात १० रुपये अशी वाढ करण्यात आली असून पुराच्या स्थितीने मराठवाडा ग्रस्त आहे. त्यामुळे केवळ यावर्षीसाठी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये प्रतिटन साखर कारखान्यांना त्यांच्या नफ्यातून द्यायला सांगण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी कारखानदारांचा पुळका घेऊ नये असा टोलाही शेलार यांनी लगावला.
शेतकर्यांच्या पाठिशी महायुती सरकार भक्कमपणे उभे असून साखर कारखान्यांचा नफा हा ३० हजार कोटींच्या घरात आहे. या ५ रुपयांतून फार फार तर ५० कोटी रुपये गोळा होतील. आणि विरोध करायचाच असला तर या नफ्यातून वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटसाठी वर्षानुवर्षे प्रतिटन कर का आकारला जातो, त्याला इतके वर्ष विरोध का केला नाही, हिंमत असेल तर आजही तशी मागणी करुन दाखवा असे आव्हानही शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.
करोना काळात शेतकरी, कामगार, कष्टकरी, श्रमिक अडचणीत होते तेव्हा तुम्ही बिल्डरांना १२ हजार कोटींची खैरात वाटली. तुम्हाला बिल्डर, कंत्राटदार यांचेच पडले आहे. शेतकऱ्यांचे दु:ख, अडचण कळणार नाही असा टोला लगावतानाच ठाकरे यांनी करोना काळात जमा केलेल्या ८०० कोटींचा हिशेब द्यावा अशी मागणीही शेलार यांनी केली आहे.
.