मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील खारबाव – जुचंद्रदरम्यान रविवारी रात्रकालीन विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. परिणामी, प्रवासादरम्यान प्रवाशांचा खोळंबा होण्याची चिन्हे आहेत.

रविवारी रात्री १२ ते पहाटे ४ पर्यंत खारबाव – जुचंद्रदरम्यान अप आणि डाऊन मुख्य मार्गावर ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅक कालावधीत खारबाव येथे रेल्वे उड्डाणपुलाची (आरएफओ) अभियांत्रिकी आणि पायाभूत कामे करण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक ११०४९ अहमदाबाद – कोल्हापूर एक्स्प्रेस वसई रोड स्थानकादरम्यान रात्री ३.३० ते पहाटे ४ पर्यंत थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक २२१९३ दौंड – ग्वाल्हेर अतिजलद एक्स्प्रेस भिवंडी रोड स्थानकादरम्यान रात्री ३.४९ ते पहाटे ४ पर्यंत थांबवण्यात येईल.

गाडी क्रमांक १२२९७ अहमदाबाद – पुणे दुरांतो एक्स्प्रेस १० ते १५ मिनिटे विलंबाने धावेल. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.