मुंबई : विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर महायुती सरकारकडून राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्यात आले. या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वरळीतील एनएससीआय डोम येथे मराठीचा विजयी मेळावा होत आहे.

यानिमित्ताने अनेक वर्षांनंतर राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर दादरमधील शिवसेना भवन परिसरात मोठ्या प्रमाणात लक्षवेधी फलकबाजी केलेली पाहायला मिळत आहे.

राखण्या महाराष्ट्र धर्म, मराठीसाठी केलेले कर्म, मायमराठीचा आवाज दिल्लीकरांना बसू दे, कलानगर आणि शिवतीर्थावरून जमलेल्या तमाम… अशी डरकाळी एकत्र घुमू दे! असा आशय आणि बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचे छायाचित्र असलेला फलक लागलेला आहे. तसेच मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे येत आहेत… तुम्हीही नक्की या, असा आशय असलेला फलक, तसेच उद्धव व राज ठाकरे यांच्याकडून एकत्रित आमंत्रण असलेल्या निमंत्रण पत्रिकेचे फलक शिवसेना भवनासह मुंबईतील ठिकठिकाणी लागलेले आहेत.

ही फलकबाजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, वरळीतील एनएससीआय डोम येथे होणाऱ्या मेळाव्याला राजकीय रंग चढवू नये, हा मेळावा मराठीच्या विजयाचा असून मराठीप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात ठाकरे बंधूंनी केल्यानंतर सर्व फलकांवर राजकीय पक्षाचे नाव व चिन्ह देण्यात आलेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण कल्पकतेच्या जोरावर घोषवाक्ये तयार करीत लक्षवेधी फलकबाजी करण्यात आली आहे. तर अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधूंना एकाच व्यासपीठावर पाहण्यासाठी मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी व सदस्य आणि सर्वसामान्य नागरिकांनी वरळीतील एनएससीआय डोम परिसरात गर्दी करायला सुरुवात केली आहे.