मुंबई : पुरेशा सोयी – सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी पाड्यांमधील दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी मुंबईतील डबेवाल्यांनी पुढाकार घेतला आहे. डबेवाला रोटी फाउंडेशन व कपडा बँकेच्या माध्यमातून पुण्यातील दोन ठाकरवाड्यांमधील ३० कुटुंबांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. महिलांना साड्या आणि पुरुष व लहान मुलांनाही कपडे वाटप करण्यात आल्याने आदिवासी पाड्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.
गेली अनेक वर्षे मुंबईतील विविध कार्यालयांमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना नित्यनियमाने दररोज घरचा दुपारचा जेवणाचा डबा पोहोचवण्याचे काम मुंबईचे डबेवाले करतात. तसेच, मुंबई डबेवाला असोसिएशनअंतर्गत विविध स्तुत्य उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचाही प्रयत्न केला जातो. रोटी फाउंडेशन व कपडा बँक या उपक्रमातून गरजूंना अन्न व वस्त्रांचे वाटप केले जाते.
दिवाळीत विविध आदिवासी पाड्यांमधील दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न डबेवाला असोसिएशन करत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही डबेवाल्यांनी सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीनिमित्त पुणे येथील दोन ठाकरवाडीतील सुमारे ३० कुटुंबांना नवीन कपड्यांचे वाटप केले. महिलांना साड्या, पुरुषांना टी शर्ट व लहान मुलांनाही कपड्यांसह खाऊचे वाटप करण्यात आले.
डबेवाले कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करणार
मुंबईतील डबेवाल्यांनी दिवाळीनिमित्त पाच दिवसांची रजा घेतली असून बहुतांश डबेवाले आपापल्या गावी रवाना झाले आहेत. ९० टक्के डबेवाले पुण्यातील मावळ भागातील असल्यामुळे त्यांना कामामुळे कुटुंबापासून दूर राहावे लागते. त्यामुळे वर्षातून काही ठराविक सणाला आवर्जून रजा घेऊन ते कुटुंबासोबत वेळ घालवतात. यावेळीही डबेवाल्यांनी रजा घेतल्याने जेवणाचे डबे पोहोचवण्याची सेवा २० ते २५ ऑक्टोबर या कालावधीत बंद राहणार आहे. सोमवार, २७ ऑक्टोबरपासून डबेवाल्यांची सेवा नियमितपणे सुरू होईल. या दिवसाच्या रजेचा पगार कापून घेऊ नये. दिवाळी बोनस म्हणून एक ज्यादा पगार द्यावा व तो सप्टेंबर/ऑक्टोबर महिन्याच्या पगाराबरोबर द्यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनने ग्राहकांकडे केली आहे.