मुंबई: मागील दोन दिवसांपासून मुंबईत संततधार सुरू असलेला पाऊस आजपासून ओसरणार आहे. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात पुढील काही दिवस कोरडे वातावरण असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेले दोन दिवस मुंबई शहर, तसेच उपनगरात पावसाच्या सरी कोसळत होत्या. काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला होता. यामुळे मुंबईच्या तापमानातही घट झाली. मात्र, आजपासून मुंबईतील पावसाचा जोर ओसरणार आहे. काही भागात हलक्या सरी होतील. परंतु वादळी वाऱ्यांची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

शहरात पावसाची शक्यता १० टक्क्यांपेक्षा कमी असून, आकाश प्रामुख्याने अंशतः ढगाळ किंवा निरभ्र राहील. काही भागांत आर्द्रतेचा परिणाम जाणवू शकतो, मात्र जोरदार सरींची शक्यता कमी आहे. त्यामुळे मुंबई परिसरात कमी दमट आणि तुलनेने उष्ण वातावरण जाणवण्याची शक्यता आहे.

मुंबईत गुरुवारी सकाळी ८:३० ते शुक्रवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत झालेला पाऊस

मरोळ अग्निशमन केंद्र – ६.८५ मिमी

वर्सोवा उदंचन केंद्र – ५.८४ मिमी

विक्रोळी – ९.६ मिमी

भांडूप – १७.०२ मिमी

कुलाबा अग्निशमन केंद्र – १५.२४ मिमी

नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्र – ९ मिमी

मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा

मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी, राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण असेल.

आज पावसाचा अंदाज कुठेमध्य महाराष्ट्र

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर.

विदर्भ- यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.

दक्षिण अंदमानमध्ये मोसमी पाऊस लवकर

नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे यंदा आठ दिवस अगोदरच मोसमी पाऊस दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी २२ मे दरम्यान मोसमी पाऊस अंदमानात दाखल होतो, यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस मलेशिया, सिंगापूर, सुमात्रा बेटाचा उत्तरेकडील भाग ओलांडून भारताच्या अंदमान व निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील आग्नेय बंगालच्या उपसागरात तो १३ मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे.