मुंबई : गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाचा जोर होता. विदर्भात पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला होता. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. आता पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. दरम्यान, कोकणासह घाटपरिसरात आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेले दोन तीन दिवस पावसाने उघडीप दिली होती. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. मात्र, रविवारपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. कोकणासह घाट परिसरात रविवारपासून पाऊस पडत आहे. आजही कोकण आणि घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कमीकमी दाबाचे क्षेत्र
उत्तर बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत असल्याने या भागातही आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
मोसमी पावसासाठी पोषक
राज्यात पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता पुन्हा कोकण आणि घाट परिसरात मोसमी पाऊस सक्रिय होण्यास पोषक वातावरण आहे. कोकण तसेच घाट परिसरात अनेक भागात रविवारपासून मुसळधार पाऊस पडला आहे. याचबरोबर आजही या भागात पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आज पावसाचा अंदाज कुठे
मुसळधार पाऊस (येलो अलर्ट) – ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर
वादळी वाऱ्यासह – धुळे, नंदुरबार, नाशिक घाट परिसर
हलक्या सरी – मुंबई, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी
राज्यातील काही भागात पावसाची उघडीप
राज्यातील काही भागात, प्रामुख्याने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाचा जोर ओसरेल. अधूनमधून हलक्या सरी बरसतील. आत्तापर्यंत ज्या भागात अपेक्षित पाऊस झालेला नाही त्या भागात जुलै अखेर, ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी पावसावर हवामान बदलाचा परिणाम होत असल्यामुळे यंदा काही भागात जास्त पाऊस तर काही भागात अल्प प्रमाणात पाऊस राहील. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी यामुळे नंतर चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.