मुंबई : मागील तीन – चार दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागात गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत, तसेच इतर भागात पावसाचा जोर कायम आहे. कोकण, तसेच विदर्भात पावसाचा जोर अधिक होता. या भागात मागील दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, उत्तर बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होणार आहे. त्यामुळे राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर कमी होणार आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतील.

मात्र, मुसळधार पावसाची शक्यता कमी असेल, असे हवामान विभागाने सांगितले. मुंबई शहर, तसेच उपनगरांत शनिवारी पहाटेपासून पाऊस पडत होता. उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता. मुंबईसह ठाणे, पालघर भागात रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत कुलाबा येथे १.२ मिमी, तर सांताक्रूझ येथे ३.७ मिमी पाऊस नोंदला गेला.

महाबळेश्वरमध्ये मुसळधार

गेल्या २४ तांसात म्हणजेच शुक्रवारी सकाळी ८:३० ते शनिवारी सकाळी ८:३० पर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत येथे २५७.८ मिमी पावसाची नोंद झाली. आत्तापर्यंत महाबळेश्वर येथे ३२६१.१ मिमी पाऊस नोंदला गेला आहे.

रायगड जिल्ह्यातील नद्यांची पातळी

मागील तीन – चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील कुंडलिका नदीने शनिवारी इशारा पातळी ओलांडली होती. तर इतर नद्यांची इशारा पातळी कमी होती.

गेल्या २४ तासांत (शुक्रवारी सकाळी ८:३० ते शनिवारी सकाळी ८:३०) झालेला पाऊस (तालुकानिहाय)

पेण- ९२ मिमी

पनवेल – ९३.८० मिमी

कर्जत – ११४.७० मिमी

माथेरान – २०१ मिमी

पोलादपूर – १४५ मिमी

लोणावळा – १८२.४ मिमी

दोडामार्ग- ६० मिमी

संगमेश्वर- ६० मिमी

अंबरनाथ- १०१ मिमी

विक्रमगड- १०१

जव्हार- ११६ मिमी

वाडा- १०३ मिमी

राधानगरी – १४६ मिमी

शाहूवाडी- १०२ मिमी

गगनबावडा- ६४ मिमी

गोंदिया जिल्ह्यात पूर

गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. पावसाची संततधार सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते. तसेच नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रविवारी पावसाचा अंदाज कुठे

मुसळधार पाऊस

मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर

अतिमुसळधार पाऊस

रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर

मेघगर्जनेसह पाऊस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ