मुंबई : मुंबईत सोमवारी पावसाने हजेरी लावली. मुसळधार पाऊस झाला नसला तरी हलक्या सरी सकाळपासून बरसल्या. मागील दोन – तीन दिवसांपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू होती. मुंबईत मंगळवारपासून पुढील दोन ते तीन दिवस हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह राज्यातही पावसाचा जोर ओसरणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, मुंबईत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने ओढ दिली. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे, मुंबईत जुलै महिन्याच्या सरासरीइतका तरी पाऊस पडेल का, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाचा जोर होता. विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मुंबईतही हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर, मात्र मंगळवारपासून पुढील चार ते पाच दिवस मुंबईसह राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभगाने सांगितले आहे.

मुंबईत सोमवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. सायंकाळी देखील काही भागात पाऊस पडला. दरम्यान, मुंबईत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून फारसा पाऊस पडलेला नाही. अशीच परिस्थिती जून महिन्यातही होती. ठराविक चार – पाच दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जून महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली होती. मात्र, जुलै महिन्यात सरासरी इतका पाऊस पडेल की नाही अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १ ते १४ दरम्यान १२३.६ मिमी तर, सांताक्रूझ येथे १८९.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात कुलाबा येथे ७३४.१ मिमी, तर सांताक्रूझ येथे ८५५.७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. परंतु, आत्तापर्यंत नोंदलेला पाऊस बघता जुलै महिन्यात सरासरी इतका पाऊस पडेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दक्षिण पश्चिम बंगाल आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, या प्रणालीची तीव्रता वाढणार आहे. यातच वायव्य मध्य प्रदेश आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यालागत समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत.

दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. त्यानुसार, कोकणातील सर्व जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज आहे. धुळे आणि नंदूरबारमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच भंडारा आणि बुलढाणा भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मराठवाडा येथे सर्वात कमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या हंगामात मराठवाडा येथे सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते १४ जुलैपर्यंत येथे २०७.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र, या कालावधीत येथे ११६.२ मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच ४४ टक्के पावसाची तूट आहे. मध्य महाराष्ट्रात २३ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली,, तर कोकण आणि विदर्भात सामान्य पावसाची नोंद झाली आहे.