मुंबई : हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे. पुढील काही तास या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या कालावधीत मुंबईतील उपनगरात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. या भागात पावसाचा जोर जास्त असेल.
मध्य प्रदेशवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि समुद्रामधील आणि किनारपट्टीवरील वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे मंगळवारी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मुंबई, ठाणे, रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसरातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी सकाळी ८:३० ते मंगळवारी सकाळी ८:३० पर्यंत १२.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३८.२ मिमी पावसाची नोंद झाली. पवई, सांताक्रूझ वांद्रे, अंधेरी, कुर्ला या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
हवामान विभागाचा अंदाज फोल
हवामान विभागाने सोमवारपासून पुढील दोन- तीन दिवस मुंबईसह कोकण आणि इतर भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, हा अंदाज फोल ठरवत सोमवारी मुंबईत दिवसभर पाऊस पडला. त्यानंतर रात्री काहीं प्रमाणात पावसाचा जोर वाढला. मंगळवारी सकाळपासून मुंबईत पाऊस पडत आहे. दुपारी साडेबारा नंतर हवामान विभागाने इशारा जारी केला.
रायगड जिल्ह्यात मुसळधार
रायगड जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागात पाणी साचले आहे. गेल्या २४ तासांत अनेक भागात १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. करंजवाडी आणि नांदगाव येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. येथे १६१ मिमी पाऊस नोंदला गेला आहे.