राज्यातील करोना संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. दररोज करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे. याशिवाय ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही भर पडतच आहे. मुंबई, पुणे या महागरांमध्ये रूग्ण संख्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी ऑफलाईन शाळा, महाविद्यालये ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना, नागरिकांना कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना करत, जर रूग्ण संख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला तर लॉकडाउनचा विचार करावा लागेल, असा सूचक इशारा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल हे एकंदर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आपण जी यंत्रणा उभी केली आहे, त्या यंत्रणेच्या माध्यमातून आजही मग विलगीकरण केंद्र असतील, रूग्णालये, गृह विलगीकरण या सगळ्यांकडे महापालिका म्हणून आमचं लक्ष आहे. आज कुणालाही लॉकडाउन नकोय, निश्चितच लॉकडाउन असताच कामा नये. कारण, आता कुठेतरी सगळेजण सावरत आहेत आणि पुन्हा जर लॉकडाउनचं सावट निर्माण झालं तर सगळ्यांचं कंबरडं मोडेल. त्यामुळे सर्वांनी जर सर्व नियमांचे पालन केले योग्य ती काळजी घेतली आणि सर्वजण जबाबदारीने वागले तर आपल्याकडे लॉकडाउन होणार नाही. पण जर दररोजच्या रूग्णसंख्येने २० हजारांचा आकाडा ओलांडला तर मात्र केंद्राने दिलेल्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल. मुख्यमंत्री एक-दोन दिवसांमध्ये करोना परिस्थितीवर बोलू शकतात. कारण, रूग्ण संख्या तीन-चार पटीने वाढत आहे.”

तसेच, “वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे. पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग हे नेहमीप्रमाणे ऑनलाईन जसं पूर्वी सुरू होतं, त्याप्रमाणे राहील असं सांगण्यात आलेलं आहे. रूग्ण संख्या वाढत आहे घाबरण्याची गरज नसली तरी तीन-चार पटी रूग्ण संख्या वाढणे ही बाब चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जी काही निर्बंध घातली गेली आहेत आणि ज्या पद्धचतीने लसीकरणावर आपण जोर देत आहोत, लशीचे दोन्ही डोस हे झालेलेच पाहिजे. १५ ते १८ वयोगटामधील मुलांचं कालच्या दिवसात दोन ते अडीच हजाराच्या आत बऱ्यापैकी ९ केंद्रांवर लसीकरण झालेलं आहे. गर्दी टाळा असं नेहमीच मुख्यमंत्री सांगत असतात, थोडसं दुर्लक्ष नक्कीच होतंय. गर्दी टाळली पाहिजे, या गर्दी टाळण्यासाठी शिवसेनेने आपले दोन कार्यक्रम रद्द देखील केले. त्यामुळे सर्वांनीच गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळलं पाहिजे. नियमांचे पालन करून समारंभ केले पाहिजेत. ” असंही यावेळी पेडणेकर यांनी बोलून दाखवलं.

वीस टक्क्यांपेक्षा जास्त घरांमधील रहिवासी बाधित झाल्यास इमारत प्रतिबंधित ; मुंबई महापालिकेची नवी नियमावली

वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्र्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने इमारती प्रतिबंधित करण्याबाबतच्या नियमावलीत बदल केला आहे. इमारतीतील २० टक्क्यांपेक्षा अधिक घरांमध्ये करोना रुग्ण असल्यास संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्यात येणार आहे. मुंबईत वेगाने रुग्ण वाढत असून ओमायक्रॉन या नवीन विषाणू प्रकाराचे रुग्णही आढळू लागले आहेत. यावेळी संसर्गाचा वेग जास्त असल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने इमारत प्रतिबंधित करण्याबाबतच्या नियमात बदल केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then lockdown has to be considered as per the rules of the center indicative warning from mumbai mayor kishori pednekar msr
First published on: 04-01-2022 at 12:49 IST