मुंबई : एखाद्या सायबर गुन्ह्यामध्ये पैसे बुडालेल्यांची माहिती मिळवायची, पोलीस असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि मग त्यांच्याकडून आणखी पैसे उकळायचे… फसवणुकीचा हा नवा प्रकार उजेडात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची व्याप्ती नेमकी किती आहे, याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

अनिल दरेकर (३५) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो रायगड जिल्ह्यातील पनवेलचा रहिवासी आहे. ज्यांनी सायबर फसवणुकीबाबत तक्रारी केल्या असतील, त्यांची माहिती तो मिळवत असे. त्यानंतर पीडितांशी संपर्क साधून आपण ‘१४ सी’ आणि १९३० या सायबर पोलिसांच्या मदत कक्षातून बोलत असल्याचे सांगत असे व ‘सायबर लिगल अँड टेक्निकल’ असे लिहिलेले आणि भारतीय राजमुद्रा असलेले ओळखपत्रही पाठवत असे. संबंधित व्यक्तीने केलेल्या तक्रारीबाबतही माहिती तो दत असे. त्यामुळे पीडितांना संशय येत नव्हता. एकदा त्यांचा विश्वास बसला, की गुन्ह्यात बुडालेले पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन देऊन न्यायालयीन कामकाज, वकिलांचे शुल्क तसेच अन्य कारणांसाठी पैसे मागत होता, अशी माहिती पश्चिम सायबर विभागाच्या पोलिसांनी दिली. फसवणुकीची ही नवीनच पद्धत समोर आल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. ज्यांचे लाखो रुपये बुडाले आहेत, त्यांना पोलीस पैसे मिळवून देतील अशी आशा असते. याचाच गैरफायदा आरोपी घेत होता.

मुंबईतील अंधेरीमधील एक तक्रारदार विजयकुमार श्रीवास्तव यांच्याशी दरेकरने असाच संपर्क साधला. त्यांना संशय आल्याने ते शहानिशा करण्यासाठी नजिकच्या पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा त्यांना असा कोणी अधिकारी किंवा अशी पद्धत नसल्याचे सांगण्यात आले आणि ही बनवाबनवी समोर आली. पोलिसांनी सापळा रचून दरेकरला अटक केली.

पोलिसांचे आवाहन

अशा प्रकारची कोणतीही माहिती ‘१४ सी’ आणि १९३० या मदतवाहिनी कक्षाकडून घेतली जात नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुडालेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी कुणाकडे पैशांची मागणी झाली असेल किंवा यापुढे केली, तर सायबर पोलीस मदतवाहिनी किंवा नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.