मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. मध्य रेल्वेने मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने तातडीने मातीचा ढिगारा हटविला. मात्र तातडीच्या अन्य कामांसाठी सीएसएमटी-वडाळा दरम्यान गुरुवारी दुपारी २ ते ४ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी येथून हार्बरवरून वाशी आणि पनवेलपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना मेनलाईनवरून कुर्लामार्गे पुढे जाण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मशीद बंदर स्थानक आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान गुरुवारी सकाळी संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. मात्र तातडीने मातीचा ढिगारा हटवून रेल्वे मार्ग लोकल सेवेसाठी मोकळा करण्यात आला. मात्र अन्य काही कामे तातडीने करणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन दुर्घटनाग्रस्त भागातील अन्य कामांसाठी सीएसएमटी-वडाळा दरम्यान गुरुवारी दुपारी २ ते ४ या वेळेत ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे हार्बरवरून वाशी आणि पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांनी मेनलाईनवरून कुर्ला येथून पुढे जाण्यास परवानगी देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.