मुंबई : राज्यातील ८३ पोलीस अधीक्षक / उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृहविभागाने याबाबतचे आदेश शुक्रवारी जारी केले. या आदेशानुसार मुंबई पोलीस दलाला आठ नवे उपायुक्त मिळाले आहेत.

गृहविभागाच्या आदेशानुसार, अजित बोराडे, निलेश अष्टेकर, वसंत जाधव, विजय पवार, तुषार पाटील, सुनील लोखंडे, महेंद्र पंडित व नम्रता पाटील या आठ उपायुक्तांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. तसेच मुंबईत कार्यरत नितीन पवार, सुनील भारद्वाज, प्रज्ञा जेढे, समाधान पवार यांची मुंबई पोलीस दलातून बाहेर बदली केली आहे. याशिवाय मुंबई पोलीस दलातील दत्ता नलावडे यांची गेल्यावर्षी लोहमार्ग उपायुक्तपदी बदली करण्यात आली होती. ती बदली रद्द करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गृहविभागाच्या आदेशानुसार, तेजस्विनी सातपुते यांची राज्य राखीव पोलीस बल पुणे, शीतल झगडे यांची पोलीस अधीक्षक दहशतवाद विरोधी पथक (मुंबई), दीपक देवराज यांची नागरी संरक्षण (ठाणे) येथे बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांसह ३१ पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय ५२ पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे. पवन बनसोड यांची ठाणे शहर, स्मिता पाटील व विनायक ढाकणे यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, प्रज्ञा जेढे यांची मध्य रेल्वे (मुंबई लोहमार्ग), योगेश चव्हाण यांची नाशिक शहर, सुनीता साळुंखे – ठाकरे यांची पश्चिम रेल्वे (लोहमार्ग मुंबई) येथे बदली करण्यात आली आहे.