मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, असे आपण म्हणतो. मात्र या महापुरुषांचा अपमान करणारा माणूस राज्यपालपदावर बसलेला असून आज तोच माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर कार्यक्रमात असेल तर याचा अर्थ काय समजायचा, असा सवाल शिवसेवना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
ठाणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात मुंबईत प्रवेश केला. या वेळी ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काही नेत्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्ये केली जात आहे. या नेत्यांविरोधात १७ डिसेंबरला महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा केवळ महाविकास आघाडीचा नसून तो महाराष्ट्रप्रेमींचा आहे. महाराष्ट्रद्रोहींच्या विरोधात हा मोर्चा असणार आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्रप्रेमींनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. केंद्रात आणि कर्नाटक राज्यात भाजप सरकार आहे. महाराष्ट्रातील सरकार सीमा प्रश्नावर बोलत का नाही? पंतप्रधान या विषयावर काही बोलणार आहेत की नाही? समृद्धी महामार्गाचे या आधीच उद्घाटन होणार होते मात्र पुल पडला. आता तो पडला की पाडला हे माहीत नाही, असा खोचक सवाल त्यांनी केला.
‘निर्भया निधी’च्या गैरवापराबद्दल राज्यसभेत आवाज उठवणार -चतुर्वेदी
राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटनात वाढ झाली आहे. उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते आहे. मात्र त्यांना राज्यात लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे निर्भया निधीचा गैरवापर केला आहे. संसदेच्या अधिवेशनात राज्यसभेत याबाबत आवाज उठवणार आहे, असे खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.