मुंबई : विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन संचमान्यता करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची आधारकार्डच्या आधारे नोंदणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने राज्यातील ४ लाख ९८ हजार ७५९ विद्यार्थी शाळाबाह्य ठरलेले असताना आता आधार कार्ड वैधतेविना ५ लाख ७८ हजार ४३३ विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे राज्यातील १० लाख ७७ हजार १९२ विद्यार्थी शाळेत असूनही पटसंख्येवरून गायब होणार असल्याने त्यांच्यावर शाळाबाह्य ठरण्याचा ठपका बसणार आहे. तसेच अद्याप ७० हजार विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची वैधता तपासण्याचे काम सुरू असून, शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी यू डायस प्लस या पोर्टलवर समाविष्ट करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. विद्यार्थ्यांची यूडायसवरील नोंदणी आधार कार्डच्या आधारे करण्यात येत आहे. या नोंदणीच्या आधाराचे संचमान्यता ठरवून शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. यू डायसवर २० ऑक्टोबरपर्यंत झालेल्या नोंदणीच्या आकडेवारीनुसार राज्यातील २ कोटी १४ लाख ६८ हजार २८८ विद्यार्थ्यांपैकी २ कोटी ९ लाख ६९ हजार ५२९ विद्यार्थ्यांनीच आधार कार्ड सादर केले आहे.
आधार कार्ड सादर केलेल्या विद्यार्थ्यांपैकी यूडायस पोर्टलवरील तपासणीत २ कोटी ३ लाख २१ हजार ४०८ विद्यार्थ्यांची आधार कार्ड वैध ठरली आहे. तर ५ लाख ७८ हजार ४३३ विद्यार्थ्यांची आधार कार्ड अवैध ठरली आहे. तसेच ६९ हजार ६८८ विद्यार्थ्यांची आधार कार्ड तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. यावरून आधार कार्ड नसलेले ४ लाख ९८ हजार ७५९ विद्यार्थी आधीच शाळाबाह्य ठरले होते. त्यात आता आधार कार्ड अवैध ठरलेल्या ५ लाख ७८ हजार ४३३ विद्यार्थ्यांची भर पडल्याने राज्यातील सुमारे १० लाख ७७ हजार १९२ विद्यार्थी शाळाबाह्य ठरणार आहेत.
हे विद्यार्थी शाळेत येत असूनही त्यांची नोंद पटसंख्येवर होणार नाही. परिणामी, पटसंख्या कमी भरणार आहे. हे विद्यार्थ्यांचे नुकसान असून हा प्रकार शिक्षणहक्क कायद्याशी विसंगत असल्याची टीका शिक्षक संघटनांनी केली आहे. या नियमामुळे ग्रामीण आणि शहरी भागांमधीलही अनेक शाळांचे अस्तित्त्व धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
