मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकलच्या डब्यांमध्ये अनधिकृत जाहिरातबाजी करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. बुवा-बाबांच्या जाहिराती लावणाऱ्यांविरोधात अद्यापही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आजही लोकलच्या डब्यांमध्ये बुवा-बाबांच्या जाहिराती दिसत आहेत.

मध्य रेल्वेवरील लोकलच्या डब्यात अंधश्रध्दा वाढवणाऱ्या जाहिराती लावण्याचे प्रकार वाढले आहे. दिशाभूल करणारी माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात येते. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या बाबा-बुवांच्या जाहिराती लोकलच्या डब्यांमध्ये अनधिकृतपणे लावण्यात येत आहेत. यावर अनेक वेळा कारवाई करण्यात येते. परंतु वारंवार बाबा-बुवांच्या जाहिराती लावण्यात येत आहेत. रात्रीच्या वेळी कुर्ला, सानपाडा कारशेडमध्ये जाऊन लोकलच्या डब्यांत भोंदूबाबांच्या जाहिराती लावण्यात येतात.

मध्य रेल्वेवरील लोकलच्या डब्यांत उद्घोषणा, डिस्प्ले आणि लोकलच्या खिडकीजवळ अधिकृतपणे जाहिराती चिकटविण्यात येतात. या जाहिरातींमुळे रेल्वेला महसूल मिळतो. लोकलच्या डब्यात अथवा रेल्वे परिसरात कोणत्याही प्रकारची जाहिरात, फलक लावण्याआधी त्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागते. तसेच जाहिरातीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क भरावे लागते. परंतु, कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे अंधश्रद्धा पसरविणाऱ्या बाबा, बुवांच्या जाहिराती लावल्या जातात. यातून अंधश्रद्धेला खतपाणी मिळते.

डोंबिवली – दादर दरम्यान प्रवास करताना लोकलच्या महिला डब्यात बाबा-बुवांच्या जाहिराती दिसून आल्या आहेत. मात्र, याकडे मध्य रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे महिलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली जात असताना, दुसरीकडे महिलांच्या डब्यात बाबा-बुवांच्या जाहिरातींचा सुळसुळाट वाढला आहे. अशा जाहिरातबाजीमुळे लोकलच्या डब्याचे विद्रुपीकरण होते. – लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

दररोज लोकलने लाखो प्रवासी प्रवास करतात. एका लोकलमध्ये एका वेळी हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे जाहिरातबाजी केल्यास, त्या जाहिरातीमधून तेवढाच प्रतिसाद मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे गेल्या काही कालावधीपासून बाबा-बुवांच्या जाहिरातीसह विकासकांच्या जाहिराती लोकलच्या डब्यात लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या जाहिराती लोकलच्या डब्यात कुठेही लावलेल्या असतात. त्यामुळे लोकल डब्याचे विद्रुपीकरण होते. प्रवाशांना लुभावण्यासाठी, बांधकाम व्यावसायिक अनेक सवलतींच्या योजनांच्या जाहिराती करतात. रेल्वे स्थानकाजवळ घर मिळणार असा जाहिरातीत उल्लेख असतो. त्याला नागरिक भुलतात आणि नुकसान करून घेतात. या सर्व जाहिराती अनधिकृतपणे लावल्या जात असल्याने, मध्य रेल्वेचा महसूल बुडत आहे.