मुंबई : गणेशोत्सवानंतर आता मुंबईत सर्वत्र नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. मात्र, सणाच्या स्वागताबरोबरच शहरात अनधिकृत फलकबाजीला उत आला आहे. विविध रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे अनधिकृत फलकांच्या विळख्यात अडकले आहेत. महापालिकेतर्फे कारवाईचे दावे केले जात असले तरीही प्रत्यक्षात फलकांवर पालिकेच्या कारवाईचा धाकच नसल्याचे दिसून येत आहे. शहरात झळकत असलेल्या फलकांमध्ये राजकीय फलकांची संख्या मोठी आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत फलकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पूर्वीच महानगरपालिकेला दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिकेतर्फे अनधिकृत फलकांवर कारवाई केली जाते. मात्र, कारवाईच्या दाव्यानंतरही शहरातील रस्ते अनधिकृत फलकांनी वेढलेले दिसून येतात. यंदा गणेशोत्सवात राजकीय पक्षांतर्फे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात फलकबाजी करण्यात आली होती. मात्र, गणेशोत्सवानंतर पालिकेने कारवाई करून फलक काढून टाकले. त्यांनतर आता पुन्हा नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने पुन्हा रस्त्यांवर अनधिकृत फलक झळकू लागले आहेत.

अनेक ठिकाणी रस्त्यावरील सिग्नल, दिशादर्शकांवर फलक लावण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा, तसेच, वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. दादरमध्ये डिसिल्वा मार्ग, सिद्धिविनायक मंदिर परिसर, रवींद्र नाट्य मंदिराशेजारच्या सिग्नलजवळ नवरात्रोत्सवानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देणारे लोकप्रतिनिधींचे फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. अंधेरीतील तारापूर चौक, सांताक्रुझयेथील कलिना परिसरातील ओमचंद चौक, मोहन गोखले मार्ग, ॲनी बेझंट रोड जंक्शनवर जाहिरातबाजी करण्यात आल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, संबंधित फलकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. मालाडमधील इनोर्बिट मॉलसमोर, तसेच वांद्रे येथील गोवर्धनदास डी. कलंत्री चौकातही फलक झळकत आहेत. माहिममधील शोभा उपहारगृहासमोरील भागात लावण्यात आलेल्या फलकामुळे सिग्नल दिसत नसल्यामुळे त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.

अनेक महिन्यांपासून फलक ‘जैसे थे’

महापालिकेला शुल्क न देता, तसेच परवानगी न घेता सर्रास फलक लावले जात आहेत. पालिकेतर्फे वेळोवेळी अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात अनेक रस्त्यांवरील फलक महिनोमहिने ‘जैसे थे’ असतात. मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, कुर्लातील काही ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवर अनेक महिन्यांपासून कारवाईच झालेली नाही. महापालिकेच्या कारवाईचा धाक न राहिल्याने सर्रासपणे फलकबाजी केली जात आहे. त्यामुळे याबाबत ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.