मुंबई : कोणत्या ना कोणत्या विषयावरून महाविकास आघाडीला व त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून आता शिवसेनेची कळ काढली आहे. संभाजीराजे खासदार झाले नाहीत हे दुर्दैवी पण त्यांना कायम पाठिंबा राहील असे विधान करत काँग्रेसचा जुना मतदार असलेल्या मराठा समाजाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
संभाजीराजे यांच्या उमेदवारीच्या निर्णयात महाविकास आघाडी म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चर्चा झाली. पण काँग्रेसला त्यात सहभागी करून घेतले नव्हते. ‘इतर पक्षांचे माहीत नाही, परंतु संभाजीराजे राज्यसभेत जावेत अशी काँग्रेसची मनापासून इच्छा होती. महाराष्ट्राच्या नेतृत्वाची एक वेगळी शान त्यांच्या नेतृत्वामुळे होती. ते खासदार झाले नाहीत हे खरेच दुर्दैवी. परंतु काँग्रेसचा त्यांना नेहमीच पाठिंबा राहील,’’ असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यातून त्यांनी शिवसेनेची कळ काढत एक प्रकारे मराठा कार्ड खेळले आहे. पुढच्या काही महिन्यांत राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यात या मराठा कार्डचा उपयोग होईल, असे काँग्रेसचे गणित असावे.