मुंबई : गौरी-गणपतीचे विसर्जन करून, कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येईल. गुरुवारी ही रेल्वेगाडी चालविण्यात येणार असून २० रेल्वे स्थानकांना थांबा देण्यात आला आहे.
गणरायाची मनोभावे पूजा करून, गणेशभक्तांनी परतीचा वाट धरली आहे. एकाचवेळी प्रवाशांची गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष अनारक्षित रेल्वेगाडी सुरू केली आहे. गाडी क्रमांक ०११६० अनारक्षित विशेष रेल्वेगाडी ४ सप्टेंबर रोजी चिपळूण येथून सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पनवेल येथे दुपारी ४.१० वाजता पोहोचेल. तर, गाडी क्रमांक ०११५९ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी ४ सप्टेंबर रोजी पनवेल येथून दुपारी ४.४० वाजता सुटून त्याच दिवशी चिपळूण येथे रात्री ९.५५ वाजता पोहोचेल. सोमटने,आपटा,जिते, पेण, कासु, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर,सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि आंजणी या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या रेल्वेगाडीला ८ मेमू डबे असतील. या रेल्वेगाडीचे तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे आरक्षित करता येतील. या तिकिटांसाठी अतिजलद एक्स्प्रेसला लागू असणारे सामान्य भाडे आकारले जाईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड द्वैसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी
गाडी क्रमांक ०११३१ द्वैसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ८.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर, गाडी क्रमांक ०११३२ द्वैसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी सावंतवाडी रोड येथून रात्री ११.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबा देण्यात आला आहे. या रेल्वेगाडीची २ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि २ द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना असेल.
भारतीय रेल्वेने गणेशोत्सव २०२५ निमित्त ३८० विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत. तर, यामधील कोकण विभागात आणि उर्वरित महाराष्ट्रात मध्य रेल्वेने ३१० गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवत आहे.