मुंबई : तारुण्याच्या पंखांत आकाशाला गवसणी घालण्याचे बळ असते. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित – दिग्दर्शित ‘ऊत’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात एका संघर्षकथेसह प्रेमकथाही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या प्रेमकथेचा नायक अभिनेता राज मिसाळ आणि नायिका अभिनेत्री आर्या सावे असून ‘ऊत’ चित्रपटाच्या निमित्ताने ही नवीन जोडी मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा नुकताच प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील सर्व कलाकार व तंत्रज्ञांनी हजेरी लावली होती.
‘चित्रपट करणे हे कसब आहे. चित्रपटनिर्मितीमागे अनेकांची मेहनत असते. आज चित्रपटाला प्रेक्षक नसताना चित्रपट बनवण्याचे धाडस करणे कौतुकास्पद आहे. ‘ऊत’ चित्रपटासाठी मला विचारणा झाली होती. पण काही कारणास्तव या चित्रपटात काम करण्याचा माझा योग जुळून आला नव्हता. पण आता चित्रपटाचे पोस्टर अनावरण माझ्या हस्ते झाले आणि या चित्रपटासोबत जोडला जाण्याचा योग जुळून आला’, असे म्हणत मकरंद देशपांडे यांनी आनंद व्यक्त केला.
तर अभिनेता राज मिसाळ म्हणाला की, ‘माझा बॅकस्टेजपासून सुरु झालेला प्रवास आज चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत येऊन पोहोचला आहे. या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. या पोस्टर अनावरण सोहळ्याप्रसंगी चित्रपटातील ‘झिंगनांग चिंगनांग लै भारी गं…’ या प्रेमगीताची खास झलक कलाकारांनी सादरीकरणातून उपस्थितांना दाखविली. वैभव जोशी यांनी लिहिलेले हे गाणे जयदीप वैद्य यांनी गायले आहे, तर संगीत आशुतोष कुलकर्णी यांचे आहे.
कान्स फेस्टिव्हलमध्ये ‘ऊत’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट विलेज न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल, सिनसिने फिल्म फेस्टिव्हल, श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मँचेस्टर फिल्म फेस्टिव्हल, अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल यासारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने आपली यशस्वी मोहोर उमटविली आहे.