मुंबई : महायुतीमध्ये रखडलेले जागावाटप मार्गी लावण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपच्या नारायण राणे यांना उमेदवारी देऊन त्याबदल्यात रायगड-रत्नागिरीची विधान परिषदेची जागा उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण यांना देण्याचे आश्वासन शिंदे गटाला देण्यात आल्याची माहिती आहे. तर नाशिकची जागा शिंदे गटाकडेच कायम राहील, अशी शक्यता बळावली आहे.

महाविकास आघाडीतील जागावाटप गेल्या आठवडय़ात जाहीर झाले. महायुतीत ९९ टक्के जागावाटप पूर्ण झाल्याचे दावे तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी केले असले तरी उरलेल्या एका टक्क्यावर घोडे अडले आहे. ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, दक्षिण मुंबई येथे अद्याप सहमती झालेली नाही. यावर मार्ग काढण्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी खल केल्याची माहिती असून शुक्रवारी किंवा शनिवारी जागावाटप जाहीर करण्याचे नियोजन आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा किरण सामंत यांना मिळावी, म्हणून उद्योगमंत्री आग्रही आहेत. मात्र भाजप राणेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असून त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. या वादावर तोडगा म्हणून विधान परिषदेची रत्नागिरी-रायगड-सिंधुदुर्गची जागा किरण सामंत यांना देण्याचा प्रस्ताव भाजपने दिल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तेथील आमदार असून त्यांची मुदत ३१ मे रोजी संपणार आहे. महापालिका व नगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर या मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. मात्र यावर राष्ट्रवादी किंवा तटकरे यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. नाशिकच्या जागेवर छगन भुजबळ यांनी दावा केला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही जागा सोडण्यास अजिबात तयारी नाहीत. त्यामुळे तेथे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ठाणे आणि नाशिक  मिळणार असतील दक्षिण मुंबईवरील दावा सोडण्याची तयारी शिंदे गटाने दाखविल्याची माहिती आहे.

सातारा आणि रत्नागिरीची प्रतीक्षाच

सातारा आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. ही मुदत शुक्रवापर्यंत आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले व रत्नागिरीत राणे यांनी तयारी केली असली, तरी त्यांची अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.