मुंबई : सोज्वळ चेहरा आणि वत्सलमूर्ती म्हणून आपल्या भूमिकांमधून रसिकांच्या स्मरणात राहिलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे शनिवारी दुपारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या.

वत्सला देशमुख यांना प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी संध्याकाळी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

मराठी आणि हिंदी चित्रपटांतून दिसलेला प्रेमळ वहिनी, बहीण, आई, आजी अशा भूमिकांमधला ओळखीचा चेहरा म्हणजे वत्सला देशमुख. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ ‘पिंजरा’ या एकमेव चित्रपटात त्यांनी खलनायकी छटा असलेली व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांनी या चित्रपटात साकारलेली आक्काची भूमिका खूप गाजली. त्यांचे त्यातील संवादही लोकप्रिय झाले होते. आपल्याला अजून खलनायकी भूमिका करायची इच्छा होती, मात्र ‘पिंजरा’तील भूमिका यशस्वी होऊनही तशी संधी कोणीच दिली नाही, अशी खंत त्यांनी एकदा ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती. वत्सला यांचे कुटुंबच मनोरंजनाच्या क्षेत्राशी जोडले गेले होते. त्यांचे वडील श्रीधरपंत देशमुख हे बापुराव पेंढारकर यांच्या ‘ललित कलादर्श’कंपनीत होते. ते त्या कंपनीतील नाटकांतून लहान-मोठय़ा भूमिका करत असत. मात्र हळूहळू कंपनीची नाटके चालेनाशी झाली, पुढे कंपनी युगही सरले. तेव्हा त्यांचे वडील मुंबईत नोकरी करू लागले. ते मुंबईत स्थिरस्थावर झाल्यानंतर वत्सला यांचे संपूर्ण कुटुंबच मुंबईत आले.