scorecardresearch

मुंबईत १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे.

मुंबईत १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
(संग्रहीत छायाचित्र)

मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे. हवामान विभागाने मुंबईत १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाची रिपरिप सुरू होती. पश्चिम आणि पूर्व उपनगरांत रविवारी दमदार पाऊस पडला. मात्र शहरात किरकोळ पावसाची नोंद झाली. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यातील विविध ठिकाणी पाऊस सक्रिय झाला आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

काही ठिकाणी एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तुकड्या तैनात –

मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. तर यवतमाळसह काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही ठिकाणी एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी –

राज्यात ११ ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून नदीकाठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी ८ ते १० ऑगस्ट या काळात पाऊस पडण्याची, तसेच कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या