मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ब्रिटनमधील ‘व्हर्जिन’ उद्योग समूहाचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी गुरूवारी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत पुणे-मुंबई दरम्यान प्रस्तावित हायपर-लूप प्रवासी वाहतुकीसाठीच्या वेगवान तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्पासंदर्भात तसेच हवाई वाहतूक क्षेत्राशी निगडीत चर्चा करण्यात आली. ब्रॅन्सन यांनी त्यांच्या समूहाच्या विविध प्रकल्पांबाबत यावेळी मुख्यमंत्र्याना माहिती दिली.
रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या उद्योग समूहाला महाराष्ट्रात उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प निर्माण करण्यात स्वारस्य असल्याचे त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते.
मुंबई-पुणे हायपरलूपला जुलै २०१९ च्या मंत्रिमंडळ बैठकीत पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून आधीच्या सरकारने मान्यता दिली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या प्रकल्पाचा फेरविचार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती. तसंच हा प्रकल्पही स्थगित होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. याच पार्श्वभूमीवर व्हर्जिन कंपनीचे सर्वेसर्वा रिचर्ड ब्रॅन्सन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचंही म्हटलं जात होतं.
काय आहे हायपरलूप तंत्रज्ञान?
हायपरलूप तंत्रज्ञानामध्ये हवेच्या निर्वात पोकळीतून गतिरोधाशिवाय विशिष्ट वाहनातून प्रवासी किंवा सामानाची ने-आण करणे शक्य होते. यासाठी विशिष्ट प्रकारच्या टय़ूबची (बोगदा) निर्मिती करावी लागते. या टय़ूबमध्ये कॅप्सूलच्या आकाराचे डबे असतात. हे डबे टय़ूबमधील चुंबकीय तंत्रज्ञान असलेल्या रुळांवरून धावतात. टय़ूबमध्ये हवेचा प्रतिरोध नसल्याने आणि चुंबकीय तंत्रज्ञानामुळे हे डबे विमानाच्या वेगाने धावू शकतात. एका डब्यामधून २८ ते ३० प्रवासी प्रवास करू शकतात. हायपरलूप ट्रेनचा वेग हा ध्वनीच्या वेगाइतका असल्याचा दावा केला जात आहे.