मुंबई : मध्य रेल्वेच्या विविध मार्गावर प्रवाशांच्या गर्दीचे प्रमाण प्रचंड वाढत असून प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी लोकलच्या फेऱ्या वाढवणे आवश्यक आहे. परंतु, मर्यादित रेल्वे मार्गामुळे वाढीव लोकल फेऱ्या चालविण्यावर बंधने येत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्लादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गातील महत्त्वाच्या कुर्ला उन्नत मार्गाचे काम सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांत या उन्नत मार्गाच्या कामाला गती मिळाली असून नव्या वर्षात हा उन्नत मार्ग नव्या वर्षात सेवेत दाखल होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.
कुर्ला रेल्वे उन्नत मार्ग प्रकल्प हा मुंबई सीएसएमटी-कुर्ला प्रकल्पादरम्यानच्या प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या प्रमुख कामांपैकी एक आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) – २ ब अंतर्गत सीएसएमटी – कुर्ला दरम्यानचा १७.५० किमीचा प्रकल्प असून मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे पायाभूत कामे केली जात आहेत.
आतापर्यंत काय केले काम ?
कुर्ला – परळदरम्यान रेल्वे मार्गातील पहिल्या टप्प्यात कुर्ला उन्नत मार्गाचे काम मोडते. या कामात आतापर्यंत एकूण ९४ तुळया, २७ स्पॅन डेक स्लॅब कास्टिंग, ३४९ बोरिंग आणि पाइल फाऊंडेशन कास्टिंग आदी कामे पूर्ण झाली आहेत. तुळयांची उभारणीसाठी ३५० टन क्षमता असलेल्या क्रेनचा वापर करण्यात येत आहे.
या प्रकल्पामुळे कोणते फायदे होणार ?
या प्रकल्पामुळे सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेलदरम्यान लोकल सेवेची वारंवारता वाढेल. तसेच वेळेवर प्रवाशांचा प्रवास होईल. गर्दी आणि प्रतीक्षा कालावधी कमी होईल. या प्रकल्पाच्या कामात पादचारी पूल, स्कॉयवॉक, दुकाने, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा प्रदान करण्यात येईल. यासह उन्नत हार्बर मार्गावरील स्थानक असेल. नवीन रेल्वे रूळ, उंच उड्डाणपूल, पदपथ, आधुनिक स्थानक सुविधा उभारण्यात येणार असल्याने, मुंबईच्या सर्वात व्यस्त मार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी मदत होईल. तसेच प्रवास सुरळीत, जलद होईल.
कोणकोणती कामे होणार आहेत ?
कुर्ला येथे पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी जागा तयार करण्यासाठी, हार्बर मार्गाचे फलाट क्रमांक ७ आणि ८ तोडण्यात येणार आहे. ही मार्गिका उन्नत मार्गावर वळवण्यात येतील. तसेच उन्नत हार्बर स्थानक तयार केले जाईल. त्याची एकूण लांबी १,३३९ मीटर आहे. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने ४१३ मीटर रॅम्प, पनवेलच्या दिशेने ४२२ मीटर रॅम्प आणि ५०४ मीटर सपाट भाग आहे. तसेच २७० मीटर लांबीचे आणि १० मीटर रुंदीचे ३ उन्नत फलाट असतील. या कामांतर्गत एक स्थानक इमारत देखील प्रस्तावित आहे. ५०० मीटर लांब आणि ६ मीटर रुंद स्कायवाॅक प्रस्तावित आहे. तसेच कुर्ला पूर्व-पश्चिमेकडे जाणारे सध्याचे पादचारी पुलाचे फलाट क्रमांक सातपर्यंत तोडकाम केले जाईल. तर, या सर्व पादचारी पुलांना जोडणारा स्कायवाॅक तयार केला जाईल.