मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला वेग दिला असून येथील सहा इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. या पुनर्वसन इमारतींमध्ये एकूण १७०० घरांचा समावेश असून इमारतींचे बांधकाम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा मुंबई मंडळाचा मानस आहे.मुंबई मंडळ ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळीतील बीडीडी चाळीचा पुनर्विकास करीत आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन २०१७ मध्ये करण्यात आले होते. मात्र विविध कारणांमुळे २०२१ पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकली नाही.

सरकार आणि म्हाडा प्रकल्पातील सर्व अडचणी दूर केल्या असून ऑगस्ट २०२१ मध्ये पुन्हा भूमीपूजन करून वरळीतील पुनर्विकासाच्या कामास सुरुवात करण्यात आली. पुढील ३६ महिन्यांत घराचा ताबा देण्यात येईल, असे तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी भूमीपूजनाच्या वेळी जाहीर केले होते. त्यानुसार २०२४ अखेरीस इमारतींचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पातील इमारतींचे बांधकाम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : आरे कारशेडप्रकरणी २७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या वरळीमध्ये सहा इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या सहा पुनर्वसन इमारतींमध्ये ५०० चौरस फुटांच्या १७०० घरांचा समावेश आहे. यापैकी एका इमारतीमधील तीन मजल्याचे आरसीसी काम, तर दोन इमारतींच्या पायाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन इमारतींच्या बांधकामासही आता सुरुवात झाली आहे. इमारतींचे बांधकाम पुढील ३६ महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. एकीकडे या सहा इमारतींचे काम सुरू असतानाच दुसरीकडे टप्प्याटप्प्याने अन्य इमारती पाडून त्याजागी नव्या इमारतींच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.