मुंबई : कृषी विभागातील विविध योजनांतील गैरव्यवहार, अनियमितता आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेकायदा सुरू केलेल्या कृषी निविष्ठा संस्था, उत्पादक कंपन्या आणि विक्री केंद्रांची चौकशी करण्यासाठी यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सुधांशू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार सुरेश धस यांच्या आरोपानंतर यापूर्वी निवृत्त सनदी अधिकारी डॉ. उमाकांत दांगट यांच्याकडे चौकशीची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, सुरेश धस यांनी दांगट समिती नको, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. शिवाय दांगट यांनी अन्य कामांत व्यस्त असल्याचे सांगून चौकशी करण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे सुधांशू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कृषी निविष्ठा व उत्पादक कंपन्या काढल्या आहेत. त्या मार्फत निविष्ठा खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहेत. यातून मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. धस यांनी गैरव्यवहार केलेल्या अधिकाऱ्यांची यादी ही जाहीर केली होती. या बाबत मुख्यमंत्री कार्यालय, कृषी सचिव, कृषी आयुक्तांना धस यांनी निवेदन दिले होते. त्यानुसार खात्यांतर्गत चौकशीसाठी आता यशदाचे महासंचालक सुधांशू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चौकशीला सहकार्य करण्याचे आदेश
चौकशी समितीकडे धस यांनी केलेल्या आरोपांची माहिती सुपूर्द करावी. ही चौकशी करताना कृषी आयुक्तांमार्फत चौकशी समितीकडे देण्यात आलेल्या संबंधित चौकशी प्रकरणातील अधिकारी आणि कर्मचारी यांना विशेष चौकशी अधिकारी चौकशीसाठी बोलावू शकतात. चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी चौकशीस उपस्थित राहणे तसेच विशेष चौकशी अधिकारी यांनी मागवलेली माहिती व दस्तऐवज उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील, असेही शासन आदेशात म्हटले आहे.
