लोकल प्रवासादरम्यान बुधवारी एका २५ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना जोगेश्वरी स्थानकात घडली. तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती बोरिवली लोहमार्ग पोलीसांनी दिली.सीएसमटी येथून बुधवारी सकाळी गोरेगावला जाणाऱ्या हार्बर लोकलमधील प्रथम श्रेणी डब्यातून ही तरुणी प्रवास करीत होती. त्यावेळी या डब्याच्या दरवाजाजवळ साधारण ४० वर्षीय इसम बसला होता. लोकल जोगेश्वरी स्थानकात येताच ही तरुणी फलाटावर उतरण्याच्या तयारीत होती. त्याच वेळी या इसमाने तिचा विनयभंग केला आणि तो पळून गेला. या घटनेमुळे तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला. तात्काळ तिने अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. मात्र जोगेश्वरी स्थानक बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्याने हे प्रकरण तेथे वर्ग करण्यात आले.

हेही वाचा >>> एनआयएची मुंबईत मोठी कारवाई, पीएफआय प्रकरणी चिता कॅम्पमधून एकजण ताब्यात

पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून घेतला आणि लोहमार्ग पोलिसांनी प्रत्येक स्थानकावरील सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रण तपासले. हा इसम प्रत्येक स्थानकात उतरून पुन्हा लोकलच्या दरवाजात उभा राहात असल्याचे सीसी टीव्ही कॅमेराच्या चित्रणात दिसत असल्याचे बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले. हा इसम मनोरुग्ण असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मात्र आरोपीला अटक केल्यानंतरच अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे कदम म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तरुणीने समाजमाध्यमांवर विनयभंग झाल्याची माहिती दिली. तसेच अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल करताना सहकार्य केले नसल्याचा आरोपही या तरुणीने केला आहे. दरम्यान, अंधेरी लोहमार्ग पोलिसांनी या आरोपाचे खंडन केले आहे.