मुंबई: नवरात्रोत्सवात नृत्य सुरू असताना धक्का लागल्याने झालेल्या किरकोळ वादामुळे १९ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वनराई पोलिसांनी तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्याची चित्रफित समाजमध्यामांवर प्रसारित झाली आहे.
गोरेगाव पूर्वेकडील नेस्को कंपाऊंड येथे नवरात्रोत्सवानिमित्त दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी रात्री जेनिल बारबाया (१९) हा तरुण दांडिया खेळण्यासाठी आला होता. नृत्यू करताना त्याचा धक्का अन्य एका गटातील सदस्यांना लागला. त्यावरून वाद झाला. दुसऱ्या गटातील तिघांनी जेनीलला बेदम मारहाण केली. त्यात तो रक्तबंबाळ झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे. जखमी जेनिलची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. त्यात त्याच्या नाकातून रक्त येत असल्याचे दिसत आहे.
हा वाद दांडिया नृत्यादरम्यान सुरू झाला. जेनिलला एकचा धक्का लागला होता. जेनिलने त्याबद्दल प्रश्न विचारला असता त्या गटाने त्याला अमानुष मारहाण केली. त्यामुळे त्याच्या डोक्याला अनेक जखमा झाल्या आहेत, असे जखमी जेनीलचे वडील रुपेश बारबाया यांनी सांगितले. प्रथमदर्शनी हा किरकोळ वाद असल्याचे दिसते आहे. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. मात्र नंतर ते पोलिसांच्या व्हॅनमधून पसार झाले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आम्ही याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असल्याचे वनराई पोलिसांनी सांगितले.