लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: नियमांचे उल्लंघन केल्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणाऱ्या ‘नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ (एनएमआयएमएस) या संस्थेला दूरस्थ शिक्षण आणि ऑनलाइन अभ्यासक्रम घेण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मनाई केली आहे. या संस्थेच्या अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन ‘यूजीसी’ने विद्यार्थ्यांना केले आहे. या धरतीवर मुंबईतील विविध महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या व्यवस्थापन अभ्यासक्रमांची सत्यता पडताळणी करावी, अशी मागणी युवा सेनेने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली आहे. यासंदर्भात ‘यूजीसी’चे सचिव मनीष जोशी यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

मुंबईतील अनेक महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठांमध्ये व्यवस्थापन व विविध अभ्यासक्रम शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क आकारले जाते. काही महाविद्यालयांनी तर ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या (एआयसीटीइ) परवानगीने तत्सम अभ्यासक्रम सुरू केल्याचे युवा सेनेने पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा… संस्कृत भाषा तज्ज्ञ दीपक भट्टाचार्य यांचे निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नरसी मोनजी महाविद्यालयावर झालेल्या कारवाईमुळे इतर महाविद्यालयातील ‘व्यवस्थापन’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेला संभ्रम दूर होणे गरजेचे आहे आणि भविष्यात विद्यार्थ्यांची लुबाडणूक होऊ नये, यासाठी यूजीसीने निवेदन प्रसिद्ध करावे. मुंबईतील महाविद्यालये सर्व नियम व अटींचे पालन करीत शिक्षण देत आहेत का? याबाबत सत्यता पडताळून पहावी. जर कोणतीही कार्यवाही झाली नाही, तर आम्ही मुंबईतील महाविद्यालयांमधील व्यवस्थापन अभ्यासक्रमांबाबतची सत्यता पडताळून पाहू. यासाठी आणि मुंबई विद्यापीठातील विविध प्रश्न व समस्यांसाठी आगामी काळात आम्ही नवी दिल्लीला जाऊन यूजीसीचे संचालक प्रा. एम. जगदेश कुमार यांची भेट घेणार आहोत’, असे युवा सेनेचे मुंबई विद्यापीठातील माजी अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.