मुंबईच्या हाफकिन संस्थेला मंजुरी; पुण्याच्या बी.जे. मेडिकलमधील बाधितांवर प्रयोग

महेश बोकडे

करोनावर उपचारासाठी आता भारतात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या बीसीजी लसीच्या (बॅसिलर कॅलमेट ग्युएरिन)  प्रयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असलेल्या करोनाबाधितांवर हा प्रयोग केला जाणार आहे. केंद्राकडून त्याबाबत सोमवारी मुंबईतील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेला मंजुरी मिळाली. हाफकिन पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजसोबत या प्रकल्पावर काम करणार आहे.

करोनावर लस शोधण्यासाठी भारतासह जगभरात विविध प्रयोग सुरू आहेत. भारतात बाळ जन्मल्यावर सहा महिन्यांच्या आत बीसीजी लस अनेक वर्षांपासून दिली जाते. या लसीमुळे करोनाला अटकाव होत असल्याचे काही शोधनिबंधांच्या आधारावर सांगण्यात येत आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदही (आयसीएमआर) बीसीजी लसीवर अभ्यास करणार असल्याचे एपिडेमॉलॉजी अ‍ॅण्ड कम्युनिकेबल डिसिजेस विभागाचे प्रमुख डॉ. रमण या गंगाखेडकर यांनी १९ एप्रिलला सांगितले होते. दरम्यान, मुंबईच्या हाफकिन संस्थेतही बीसीजी लसींशी संबंधित  संशोधन झाले.

या संशोधनांच्या आधारावर हाफकिनने करोनाबाधितांवर बीसीजी लसीच्या सूक्ष्म परिणामांच्या संशोधनासाठी आरसीएमआर, क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री- इंडिया (सीटीआरआय) व इतरही संबंधित संस्थांकडे अर्ज केला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने आशा निर्माण झाली आहे.

होणार काय?

बीसीजी लसीचा राज्यात करोना बाधितांवर हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे. पुण्याच्या बी.जे. मेडिकलमध्ये दाखल करोना रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून रितसर कायदेशीर परवानगी घेऊन, निवडक लोकांना ही लस देऊन तिचे परिणाम बघितले जातील.

तीन महिने प्रात्यक्षिक

आयसीएमआर या संस्थेसह केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या सर्व संस्थांची मंजुरी मिळाल्याने लवकरच पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजसोबत संयुक्तरित्या तेथील  रुग्णांना लस देऊन संशोधनाला सुरुवात होईल. लस देण्यास तयार असलेल्या रुग्णाची विशेष काळजी घेतली जाईल.

– डॉ. राजेश देशमुख, संचालक, हाफकिन जीव- औषध निर्माण महामंडळ (मर्या.), मुंबई.