निर्णयासाठी अधिकाऱ्यांची समिती; पालकमंत्र्यांची माहिती

नागपूर : करोनाची वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी टाळेबंदी लागू करावी लागेल, असे मागील आठ दिवसांपासून अधिकारी आणि पालकमंत्री सांगत असले तरी ती केव्हा लागणार याबाबत मात्र दोघेही संभ्रमात आहेत. टाळेबंदीबाबत अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली असून तेच याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र समिती त्यांचा निर्णय केव्हापर्यंत जाहीर करेल, याबाबत त्यांनी काहीच सांगितले नाही. विशेष म्हणजे, या समितीत एकाही लोकप्रतिनिधीचा समावेश नाही.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सुरुवातीला विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी करोनाच्या सद्यस्थितीचे सादरीकरण केले. रुग्णसंख्या वाढली असली तरी त्यातील गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे स्थिती नियंत्रणात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी भूमिका मांडताना टाळेबंदी हा करोनावर नियंत्रण आणण्यासाठी पर्याय ठरू शकत नाही आणि टाळेबंदीचे समर्थनही करणार नाही, असे स्पष्ट केले. पुण्यात टाळेबंदीच्या काळात रुग्णसंख्या वाढली याकडे त्यांनी लक्ष वेधले. मात्र त्याचवेळी करोनाची वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील. त्यानुसार गरज पडली तर संचारबंदीसह १४ दिवसांसाठी टाळेबंदी लागू केली जाईल. ती केव्हापासून लागू करायची यासाठी विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी,  पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांची समिती तयार करण्यात आली असून ते याबाबत अंतिम निर्णय घेतील. त्यांना टाळेबंदी कशी असावी, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी सांगण्यात आले आहे. सर्वाशी चर्चा करून ते अंतिम निर्णय घेतील, असे राऊत म्हणाले. अधिकारी किती दिवसात त्यांचा निर्णय जाहीर करणार असे त्यांना विचारले असता त्यांनी त्यावर काहीही उत्तर दिले नाही. त्यामुळे टाळेबंदीबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.

पालकमंत्र्याच्या कल्पनेतील ‘स्मार्ट टाळेबंदी’

पालकमंत्री नितीन राऊत यांनी पुढच्या काळात लागणारी टाळेबंदी ही ‘स्मार्ट’ असेल, असे सांगितले. टाळेबंदीचा कोणालाही त्रास होऊ नये, रुग्णांच्या उपचारात खंड पडू नये, गोरगरिबांची उपासमार होऊ नये, कोणीही अन्नावाचून राहू नये, उद्योगचक्र बंद पडू नये, छोटय़ा दुकानदारांचे आर्थिक नुकसान होऊ नये, कोणीही नैराश्यात जाऊ नये, आत्महत्या करू नये या संपूर्ण बाबींचा विचार टाळेबंदी लागू करताना केला जाईल .म्हणून मी स्मार्ट टाळेबंदी असा त्याचा उल्लेख करतो, असे पालकमंत्री म्हणाले. टाळेबंदीबाबत जागृती करण्यासाठी प्रत्येक प्रभागात करोना दक्षता समिती स्थापन करण्यात येणार आहे.

राऊत यांची चाचणी नकारात्मक

पालकमंत्री राऊत यांनीही करोना चाचणी केली असून त्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे, खुद्द राऊत यांनीच ही माहिती दिली. सरकारी कार्यालयातील सर्व  कर्मचाऱ्यांची चाचणी केली जात आहे, याकडे  त्यांनी लक्ष वेधले.