आपल्या मतदारसंघातील उमेदवाराला वाऱ्यावर सोडले

स्वपक्षीय उमेदवारांवर नाराज  कार्यकर्त्यांनी शेजारच्या मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा पर्याय स्वीकारल्याचे चित्र सध्या सर्वच पक्षात दिसून येत असून त्याचे प्रतिबिंबही प्रचार मिरवणुकांमधून उमटत आहेत.

भाजपने शहरात सर्वच विद्यमान आमदारांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे. द-पश्चिम हा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ सोडला तर इतर पाच मतदारसंघात विद्यमान आमदारांविषयी पक्षातही नाराजी होतीच. अनेक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने संधी नाकारल्याने त्यांना विद्यमान आमदारासोबतच प्रचार करण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे नाराजांनी दुसऱ्या मतदारसंघात जाऊन पक्षाचा प्रचार करण्यावर भर दिला आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास उपमहापौर दीपराज पार्डीकर हे मध्यमधून इच्छुक होते. तिकीट नाकारल्याने ते मध्यचे पक्षाचे अधिकृत उमेदवार विकास कुंभारे यांच्यासोबत फिरण्याऐवजी दक्षिणमध्ये मोहन मतेंच्या प्रचार मिरवणुकीत सहभागी होत आहेत. मध्यचेच पक्षाचे वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी हे सुद्धा पश्चिममध्ये सुधाकर देशमुख यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. उत्तरमध्ये मिलिंद माने यांना उमेदवारी मिळणार नाही असा  कार्यकर्त्यांचाच अंदाज होता. तो खोटा ठरल्याने ते सध्या प्रचारात सक्रिय नाहीत. दक्षिण नागपूरमध्येही भाजपचे अनेक इच्छुक होते. येथे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह इतर छोटू भोयर यांनाही संधी नाकारली. या भागाचे उमेदवार मोहन मते यांच्या प्रचार मिरवणुकीत छोटू भोयर यांची अनुपस्थिती खटकणारी ठरली. ग्रामीणमध्ये हिंगणा मतदारसंघातील भाजपचे काही कार्यकर्ते तेथे फिरण्याऐवजी मुख्यमंत्र्यांच्या द-पश्चिम मतदारसंघात प्रचारात व्यस्त आहेत. हा मतदारसंघ नाराजांसाठी खुला आहे. शहरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते येथे प्रचारासाठी येतात.

काँग्रेसही या त्रासापासून सुटली नाही. येथे मुळातच कमालीची गटबाजी आहे. दक्षिण-पश्चिममधील शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचे समर्थक पश्चिममध्ये ठाकरे यांच्या प्रचारात गुंतले आहेत. पश्चिममधील ठाकरे विरोधकांनी द.-पश्चिमची वाट धरली आहे. द.-पश्चिमचे काँग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख यांच्या मिरवणुकीत मात्र गुरुवारी सकाळी ठाकरे सहभागी झाले होते. उत्तरमध्ये नितीन राऊत यांना विरोध करणारा वर्ग पक्षातच सक्रिय आहे. त्यापैकी काही जण दक्षिणमध्ये तर काही जण पश्चिममध्ये काँग्रेसचा प्रचार करीत आहेत. मध्यमध्ये बंटी शेळके यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमधील हलबांचा एक गट नाराज आहे. त्यांना सक्रिय प्रचारात सहभागी करून घेण्याचे शेळकेंपुढे आव्हान आहे.

सेनेला एकही जागा न सोडल्याने शिवसैनिक नाराज आहेत. त्यांनी त्यांची सर्वशक्ती दक्षिणमध्ये युतीचे बंडखोर व माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांच्यामागे उभी केली आहे. शेखर सावरबांधे यांचा अपवाद सोडला तर मोजकेच कार्यकर्ते भाजपचा प्रचार करीत आहेत. हीच स्थिती रामटेकमध्येही आहे. येथे भाजपचा उमेदवार असल्याने  कट्टर शिवसैनिक बंडखोर आशीष जयस्वाल यांच्या पाठीशी आहे. राष्ट्रवादीची शक्ती शहरात कमी असली तरी या पक्षाच्या नगरसेवकांना सोबत घेताना काँग्रेस उमेदवारांची दमछाक होत आहे.