महेश बोकडे

बांगलादेशच्या एका वैद्यकीय चमूने ‘इव्हर्मेक्टिन’ आणि डॉक्सीसाइक्लिन या औषधांच्या मिश्रणाचा करोनाबाधितांवर सकारात्मक परिणाम झाल्याचा दावा केला होता. त्याच धर्तीवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) कुणाचीही आर्थिक मदत न घेता येथे करोनाग्रस्तांवर इव्हर्मेक्टिन आणि अँजिथ्रोमायसिन या औषधांची वैद्यकीय चाचणी सुरू केली आहे. मेयोतील काही रुग्णांवर याचा सकारात्मक परिणामही आढळला आहे.

बांगलादेशमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने अ‍ॅन्टीप्रोटोझोल औषध असलेल्या ‘इव्हर्मेक्टिन’ आणि प्रतिजैविक औषध ‘डॉक्सीसाइक्लिन’च्या मिश्रणाचा प्रयोग करोनाबाधितांवर केला होता. यातील बहुतांश रुग्णांची निम्मी लक्षणे तीन दिवसांत गायब झाली तर ६० जण चार दिवसांत बरे झाल्याचा या वैद्यकीय चमूचा दावा होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यातील काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संशोधनात्मक स्तरावर औषधांचा वापर  करून बघण्याचा सल्ला दिला होता. नागपूरच्या मेडिकलमधील औषध वैद्यकशास्त्र विभागाने हे आव्हान स्वीकारले. त्यानुसार ४५ बाधितांवर चाचणी सुरू झाली.

या रुग्णांना इव्हर्मेक्टिन आणि अँजिथ्रोमायसिन या दोन्ही औषधांचे मिश्रण दिले गेले. या रुग्णांवरील परिणाम येथील इतर सामान्य उपचार सुरू असलेल्या बाधितांशी तुलना करून तपासले जात आहे. हे सर्व बाधित एकही लक्षणे नसलेले कमी जोखमीचे आहेत. या रुग्णांची प्रकल्पाअंतर्गत चार, सात आणि त्यानंतर निश्चित केलेल्या दिवसांत करोना चाचणी केली जात आहे. या औषधांचा रुग्णांवर सकारात्मक वा नकारात्मक काय परिणाम होते,  हेही तपासले जात आहे. या चाचणीला मेडिकलच्या इथिक्स समितीची मंजुरी असून  कोणतेही अर्थसहाय्य न घेता मेडिकल प्रशासनाकडून स्वत:हून या नाविन्यपूर्ण प्रकल्पावर काम सुरू आहे.

या प्रकल्पांतर्गत अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या नेतृत्वात औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावींसह इतर अधिकारी-डॉक्टरांची चमू परिश्रम घेत आहे. या चाचणीसाठी आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी औषध उपलब्ध करून दिल्या. मेयोतही औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. तिलोत्तमा पराते यांच्या नेतृत्वात दहा रुग्णांवर हे औषधे वापरण्यात आली. त्यात काही रुग्ण कमी कालावधीत करोनामुक्त झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनात आले. परंतु मेडिकलच्या अभ्यासातूनच या औषधांबाबतचा खरा निष्कर्ष पुढे येणार आहे.

‘‘वैद्यकीय शिक्षण खात्यातील प्रत्येक वरिष्ठ अधिकारी करोना नियंत्रणासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. त्याला हातभार म्हणून इव्हर्मेक्टिन आणि अँजिथ्रोमायसिन या औषधांच्या मिश्रणाची वैद्यकीय चाचणी काही बाधितांवर मेडिकलमध्ये सुरू आहे. त्यावर शोध निबंध केला जाणार असून त्यानंतरच त्याच्या निष्कर्षांबाबत सांगता येईल.’’

– प्रा. डॉ. राजेश गोसावी, औषध वैद्यकशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर</p>