‘अमेरिकेनेही ईव्हीएम नाकारले’, राहुल गांधी यांची प्रशंसा
निवडणुकीत मतदानासाठी वापरले जाणारे ईव्हीएम अमेरिकेनेही नाकारले आहे. भारतातही सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत ईव्हीएम ऐवजी देशात मतपत्रिकेद्वारेच मतदानाची प्रक्रिया राबवण्यात यावी या मागणीसाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. विधानभवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत बोलत होते. त्यांनी गुजरात निवडणूकीत पूर्ण ताकदीने उतरलेल्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींच्या कामाची प्रशंसा केली.
निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करून काहीही करता येते, असा आरोप बसपच्या नेत्या मायावतींसह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार करण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात आहे. त्यामुळे तिला वाचवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या निवडणुकी संदर्भातील शंका दूर करून जुन्या पद्धतीने (मतपत्रिकेवर शिक्का मारून) निवडणूक घेण्याची गरज आहे. त्याकरिता या मुद्यावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे, असे पवार म्हणाले.
भाजप नेत्यांनी गुजरात विधानसभा निवडणूकीत भाजपला १५० हून जास्त जागा मिळणार असल्याचा दावा केल्या होता. मात्र प्रत्यक्षात १०० च्या जवळपास जागा मिळाल्या. मतमोजणी दरम्यान मध्यंतरी भाजपचे सरकार राहते की जाते, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु शेवटच्या क्षणी भाजपने विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी पूर्ण ताकदीने लढले. त्यांनी विकासासोबत केंद्र व राज्य सरकारच्या जीएसटीतील चुका, नोटबंदी, पाटीदार समाजाच्या आंदोलनासंदर्भात भाजप सरकारची दडपशाही नागरिकांच्या पुढे मांडली. परंतु भाजपने राहूल गांधींच्या विरोधात खालच्या पातळीवर प्रचार केला. त्यानंतरही काँग्रेसला चांगले यश मिळाले, असे पवार म्हणाले. दरम्यान पंतप्रधान व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाकिस्तानशी जोडून निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे दाखवून दिले. महाराष्ट्रातही भाजपचा पराभव शक्य असून सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येवून लढण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले.
निवडणुकीत जो पराभूत होतो तो ईव्हीएम मशिनवर दोषारोपण करतो, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अजित पवार यांनी केलेल्या आरोपांच्या संदर्भात ते बोलत होते.