News Flash

आठवडी बाजार नव्हे कचऱ्याचे आगार

बाजारात पावलोपावली आढळणाऱ्या चिखल, दुर्गंधीने नागरिकांच्या नाकीनऊ येत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

 

  • चिखल, दरुगधीने नागरिकांच्या नाकीनऊ
  • कोटय़वधी मोजूनही  ‘कनक ’चे नखरे कायमच

नागपूरकरांना जीवनावश्यक वस्तू त्यांच्याच परिसरात मिळाव्या, यासाठी शहरातील विविध भागात  आठवडी बाजारांची निर्मिती करण्यात आली. रोज वेगवेगळ्या ठिकाणी असे बाजार भरत असतात, परंतु पावसाळ्यात या बाजारात पाय ठेवण्याची इच्छा होणार नाही, इतकी अस्वच्छता पसरली आहे. बाजारात पावलोपावली आढळणाऱ्या चिखल, दुर्गंधीने नागरिकांच्या नाकीनऊ येत आहेत. या बाजारातील घाण स्वच्छ करण्याची जबाबदारी  महापालिकेने ज्या कनक रिर्सोसेस कंपनीकडे सोपवली आहे, ती कंपनी वेळीच कचरा उचलत नसल्याने विविध आजारांचा प्रार्दुभाव वाढायला लागला आहे.

शहरात रोज ८०० ते १ हजार टन कचरा गोळा होतो. त्यातील २८० ते ३०० टन कचरा हा केवळ शहरातील विविध भागातील बाजारातून उचलला जातो.  कनक या खासगी कंपनीला महापालिकेकडून १३०० रुपये टन याप्रमाणे साधारण दर महिन्याला ६ ते ७ कोटी रुपये दिले जातात, परंतु त्या तुलनेत होणारी स्वच्छता नावालाच आहे. शहरातील प्रमुख बाजार असलेल्या कॉटन मार्केट, नेहरू बाजार, संत्रा मार्केट, गोकुळपेठ बाजार, बुधवार बाजार, सक्करदरातील बुधवार बाजार, जयताळा, मंगळवारी, इतवारी, दहीबाजार या बाजारांमध्ये ग्रामीण भागातील भाजी विक्रेते मोठय़ा प्रमाणात येत असतात. मात्र हे भाजी विक्रेते खराब झालेला माल त्याच ठिकाणी टाकून निघून जातात. पावसाळ्याच्या दिवसात या भाज्या सडतात व त्यांची दरुगधी सहन होत नाही. हा सडलेल्या कचरा उचलण्याची जबाबदारी कनक रिर्सोसेस कंपनीकडे आहे. मात्र, त्यांच्याकडून दररोज कचरा उचलला जात नाही.  कॉटेन मार्केटमधील बाजार कळमनामध्ये स्थांनातरित करण्यात आला असला तरी बाहेरगावातील अनेक भाजी आणि फळ विक्रेते या ठिकाणीच बसतात.

शहरात जुने भाजी बाजार पूर्वी होते त्याच पारंपरिक स्थितीत आजही आहे. त्यात कुठलीच सुधारणा करण्यात आली नाही. महाल परिसरात असलेला बुधवार बाजार आणि सक्करदरा बाजार या भोसलेकालीन बाजारातील ओटय़ांची अवस्था खराब झाली आहे. बुधवार बाजारात जागा नसल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महालातील वाडय़ासमोर बाजार भरवला जातो आणि त्याही ठिकाणी जमा झालेला कचरा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत उचलला जात नाही. सीताबर्डीतील फूल बाजाराचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही.

अनधिृकत बाजार

*  जयताळा सोनेगाव सीतानगर – रविवार, शनिवार

*  फ्रेंडस कॉलनी – बुधवार

*  उदयनगर, रिंगरोड ढगे बंगला  – शनिवार, मंगळवार

*  मानेवाडा शताब्दी चौक – बुधवार, सोमवार

*  रमना मारोती, हसनबाग – शनिवार, सोमवार

*  शांतीनगर कावरापेठ – सोमवार, बुधवार, शनिवार

*  पारडी, हिवरीनगर – रविवार, गुरुवार

*  हुडको कॉलनी पिवळी नदी – रविवार, गुरुवार

*  कपिलनगर – शनिवार, बुधवार

*  जयताळा – रविवार

अधिकृत बाजार

*  नेताजी मार्केट – सोमवार- गुरुवार

*   सुपर मार्केट सीताबर्डी – सोमवार- गुरुवार

*  गोकुळपेठ मार्केट – मंगळवार- शुक्रवार

*  मंगळवारी सदर – मंगळवार- शुक्रवार

*  वाठोडा बाजार – गुरुवार

*  सोमवारी पेठ (सक्करदरा) – बुधवार

*  बुधवारी मार्केट महाल – बुधवार

*  महात्मा फुले बाजार – शनिवार

*  लकडगंज – रविवार

*  इतवारी बाजार – रविवार

कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणार

शहरातील विविध भागातील कचरा उचलण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी ओला व सुका कचरा वेगळा जमा केला जातो. अनेकदा गाडय़ा भरुन गेल्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा गाडी जात नाही. त्यामुळे कचरा साचलेला असतो. मात्र, सणासुदीच्या दिवसात बाजारासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.

– कमलेश शर्मा, संचालक, कनक रिर्सोसेस कंपनी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2018 2:27 am

Web Title: not a week market its garbage dump
Next Stories
1 ‘स्क्रब टायफस’चा आणखी एक बळी
2 आर्थिक नुकसानीसाठी उष्ण हवामानही कारणीभूत
3 वान नदीत १५ वर्षांत ५२ बळी
Just Now!
X