संभाजीराव चव्हाण यांची नियुक्ती
नागपूर : विदर्भासाठी अंत्यत महत्त्वाचे असलेल्या मिहान-सेझ प्रकल्पाला संभाजीराव चव्हाण (आयटीएस) यांच्या रूपाने नवे विकास आयुक्त मिळाले आहेत. त्यांनी आयुक्तपदाची सुरू स्वीकारली. नवनियुक्त विकास आयुक्त संभाजीराव चव्हाण हे २००८ च्या तुकडीचे भारतीय व्यापार सेवेतील (आयटीएस) अधिकारी आहेत. मिहानमध्ये रूजू होण्यापूर्वी त्यांनी विदेश व्यापार महासंचालनालयाच्या सुरत आणि मुंबई कार्यालयात काम केले आहे. विदेशी व्यापार प्रशासन क्षेत्रात त्यांना दहा वर्षांहून जास्त अनुभव आहे. करोनानंतरच्या काळात मिहान-सेझला पुढे नेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
कार्यवाहक विकास आयुक्त म्हणून कार्यरत जयकरण सिंह (आयटीएस) यांची भारत सरकारच्या टेक्सटाईल मंत्रालय, दिल्ली येथे बदली झाली आहे. जयकरण सिंग ऑक्टोबर २०१८ पासून या पदावर कार्यरत होते. मिहान-सेझला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अनेक लहान युनिट आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मिहानला एक ग्रीन सेझ बनवण्यात ते सक्रिय होते. मिहानमधील मध्यवर्ती सुविधा भवन (डब्ल्यू बिल्िंडग) येथे एका छोटेखानी समारंभात जयकरण सिंह याना निरोप देण्यात आला तर संभाजीराव चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मिहान-सेझचे सल्लागार एस.व्ही. चहांदे यांनी शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सिंग यांचा सत्कार केला. सिंग यांनी एमएडीसीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.