बेरोजगारीतून कृत्य केल्याचा संशय

बी.ए., बी.एड्.चे शिक्षण घेतलेल्या एका विद्यार्थ्यांने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या लॉ कॉलेज चौकातील वसतिगृहात विष प्राशन करून आत्महत्या केली. बेरोजगारीमुळे मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केल्याचा अंदाज आहे.

बाळू आडे (२७) रा सोजयगाव, ता. मानोरा, जि. वाशीम असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील पोलीस दलात कार्यरत आहेत. बी.ए. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बी.एड्.च्या शिक्षणाकरिता तो नागपुरात आला. दोन वर्षांपासून तो नागपूरच्या वसतिगृहात राहात होता. सध्या तो लॉ कॉलेज चौकातील विद्यापीठाच्या वसतिगृहातील खोली क्रमांक १०७ मध्ये राहायचा. आज दुपारच्या सुमारास त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.  सुनील चव्हाण नावाचा मित्र त्याच्या खोलीवर गेला असता तो पलंगावर पडलेला होता आणि त्याच्या तोंडातून फेस येत होता. त्यामुळे त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

त्यानंतर मेडिकलमधून अंबाझरी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी काही कर्मचारी मेडिकलला पाठवले व स्वत: कर्मचाऱ्यांसह वसतिगृहात पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्यांची चौकशी केली असता उच्च शिक्षण घेतल्यानंतरही रोजगार मिळत नसल्याने कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा तणाव त्याच्यावर होता असे समजले. गेल्या पंधरा दिवसांपासून तो तणावात असल्याने विष प्राशन करून आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, त्याने मृत्यूपूर्वी काहीही लिहून ठेवले नसल्याने अद्यापही त्याच्या मृत्यूचे कारण पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.

पंधरा दिवसांपूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता. पंधरा दिवसांपूर्वी त्याने आपल्या मूळ गावी हाताच्या रक्तवाहिन्या कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कुटुंबीयांच्या लक्षात आल्याने त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल केल्याने तो बचावला होता. त्यानंतर तो नागपुरात आला व येथे आत्महत्या केली.