लोकसत्ता टीम

नागपूर : बलात्कारातून गर्भवती झालेल्या एका १४ वर्षीय मुलीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गर्भपाताची परवानगी दिली आहे. अल्पवयीन मुलगी २८ आठवड्यांची गर्भवती आहे.

वैद्यकीय मंडळाच्या शिफारसीनंतर उच्च न्यायालयाने गर्भपाताची परवानगी दिली. अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर येथे पिडीत मुलगी राहते. मार्च महिन्यात अल्पवयीन मुलीवर जवळच्या एका नातेवाईकाने बलात्कार केला. ऑक्टोबर महिन्यात मुलगी २४ महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. यानंतर मूर्तीजापूरमधील पोलिस स्थानकात पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण अकोला बाल कल्याण समितीकडे वर्गीकृत केले गेले. समितीने याविषयी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीकडे प्रकरण पाठविले. बुधवारी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांच्यासमक्ष प्रकरणावर सुनावणी झाली. वैद्यकीय मंडळाची शिफारस आणि कुटुंबीयांची परवानगी तसेच मुलीची मानसिक आणि शारीरिक अवस्था बघता मुलाला जन्म देणे योग्य नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

आणखी वाचा-नागपूर : विवाहित युवकाचा मुलीवर अत्याचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासाठी न्यायालयाने गुजरात विरुद्ध इतर प्रकरणातील निकालाचा दाखला दिला. मुलीचे गर्भपात केल्यावर तिचे गर्भाचे डीएनए तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पॉक्सो अंतर्गत प्रकरण दाखल असल्याने पुरावा सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीकोनातून शास्त्रीय पद्धतीने गर्भाचे डीएनए सुरक्षित ठेवावे, असे न्यायालयाने सांगितले. आज, ३० नोव्हेंबरला सकाळी अल्पवयीन मुलीचा गर्भपाताची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड.सोनिया गजभिये यांनी बाजू मांडली. राज्य शासनाच्यावतीने ॲड. दीपाली सपकाळ यांनी युक्तिवाद केला.