लोकसत्ता टीम

नागपूर : नागपूर जिल्ह्याला शुक्रवारी रात्री पावसाने झोडपल्याने अंबाझरी तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाला. त्यामुळे शहरातील अनेक नाल्यांना पूर आल्याने अंबाझरी, डागा ले-आऊट, शंकरनगरसह अनेक भागात पूर व पावसाचे पाणी तुंबले. परिणामी, महावितरणचे जिल्ह्यात ४५ लाखांचे नुकसान झाले. त्यापैकी सर्वाधिक ८० टक्के हानी शहरी भागात झाली आहे.

नागपूर जिल्ह्यात पावसाच्या तडाख्यात महावितरणचे उच्च दाबाच्या वाहिनीवरील ७१ आणि लघुदाबाच्या वाहिनीचे २५६ वीज खांब कोलमडून पडले. सोबत उपरी वीज वाहिनीचे उच्चदाबाच्या ०.७ किलोमीटर तर लघुदाबाच्या ५.४५ किलोमीटर लांबीच्या वाहिन्या खराब झाल्या. सोबत शहरातील १९ तर ग्रामीणचे २३ वितरण रोहित्र बिघडले. सोबत उच्च दाबाचे ७३ आणि लघुदाबाच्या १७४ वीज मीटरमध्ये पाणी शिरल्याने तेही बिघडले.

आणखी वाचा-महावितरणकडून दोन हजारांच्या नोटा स्वीकारणे बंद! एसटी महामंडळाकडून मात्र…

पावसाच्या तडाख्यात शहरातील ३ आणि ग्रामीणचे ३ अशा एकूण ६ वितरण पेट्या खराब झाल्या. तर भूमिगत वाहिन्यांबाबत शहरातील उच्च दाबाच्या ०.२४ किलोमीटर तर लघुदाबाच्या १ किलोमीटर लांबीच्या वाहिन्या खराब झाल्या. त्यामुळे शहरी भागातील ३६ लाख आणि ग्रामीण भागातील ९ लाख असा एकूण महावितरणला ४५ लाख रुपयांचा फटका बसला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भागात सर्वाधिक नुकसान

महावितरणचे सर्वाधिक नुकसान हे पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या आणि संपूर्ण तळमजला पाण्यात असलेल्या अंबाझरी, डागा ले-आऊट, कार्पोरेशन काॅलनी, शंकरनगर आणि शेजारच्या परिसरांना बसला. येथील तळमजला पूर्णपणे पाण्यात होता. तर काही भागात पहिल्या मजल्याच्याही वर पाणी शिरले होते. त्यामुळे सर्वाधिक मीटर खराब झाले. सोबत वीज यंत्रणेचेही नुकसान झाल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.