नागपूर : बुटीबोरी टाकळघाट बाजारातील सराफा व्यवसायीकाच्या कारला धडक देत ४० लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे, तसेच ७ लाख ३० हजार रुपयाचे चांदीचे दागिने लुटीचा नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी अथक परिश्रम करुन दोन आरोपींना अटक केली. कृष्णा उर्फ जॉन तिवडूजी पंचेश्वर (२७) रा. श्रमीकनगर, परसोडी, ह.मु. द्वारा श्रीमती सुशीला महादेव काकडे यांच्या घरी किरायाने, राहुलनगर, सोमलवाडा, अशोक कोंदू चौधरी (२४) रा. श्रमीकनगर, परसोडी रेल्वे लाईनजवळ, खापरी, नागपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.

ही लुटीची घटना २ डिसेंबर २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास टाकळघाट ते खापरी मोरेश्वर मार्गावर घडली होती. अतूल रामकृष्ण शेरेकर रा. खापरी मोरेश्वर असे फिर्यादीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, बुटीबोरी टाकळघाट बाजारात अतूल ज्वेलर्स नावाने फिर्यादीचे दुकान आहे. २ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ते दुकान बंद करुन घराकडे खापरी मोरेश्वर गावी कारने जात होते. दरम्यान दोन आरोपींनी दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली. यावेळी आरोपींनी मिरची पूड डोळ्यात फेकून कारमधील सोने व चांदीचे दागिने असलेली बॅग लुटली होती.

हेही वाचा – तलाठी परीक्षेत गुणांची लॉटरी! चुकलेल्या प्रश्नांचे मिळणार ११४ गुण

याप्रकरणी एमआयडीसी बोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमूख ओमप्रकाश कोकाटे, राजीव कर्मलवार यांच्या नेतृत्वात ४ पथक सक्रीय करण्यात आले. त्यांनी तांत्रिक पद्धतीचा अवलंब, तसेच खबरीच्या माहितीवरुन दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही अटक केली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, महादेव आचरेकर, भिमाजी पाटील, सहा. पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे, बट्टूलाल पांडे, पोलीस हवालदार दिनेश आधापीरे, मिलींद नांदुरकर, विनोद काळे, इक्बाल शेख, संजय बांते, प्रमोद भोयर, शंकर मडावी, उमेश फुलबेल, किशोर वानखडे, नितेश पिपरोदे, गजेंद्र चौधरी, अरविंद भगत, मयूर ढेकले, रोहन डाखोरे, अमृत किनमे, राकेश तालेवार, चालक पोलीस हवालदार अमोल कुथे, शिपाई सुमित बागडे, आशुतोष लांजेवार, सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक भारत थेटे, नायक सतिष राठोड, स्नेहा ढवळे यांनी केली.

हेही वाचा – राज्यासह देशातील काही भागांत आज पावसाची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारागृहातील कैद्याने दिली सराफाची ‘टिप’

सराफा व्यवसायिक अतूल यांना लुटण्याचा कट कारागृहात रचण्यात आला. आरोपी जॉन हा काही दिवसांपूर्वी कारागृहात बंदीस्त होता. दरम्यान येथे बंदीस्त कैदी शुभम सोबत ओळख झाली. शुभमने त्यास टाकळघाटचा सराफा अतूल हा रात्रीला दुकान बंद करुन कारने दागिन्यासह निर्जन रस्त्याने घरी जात असल्याचे सांगितले होते. जामिनावर कारागृहातून बाहेर येताच जॉनने आपला साथीदार अशोक चौधरीसह डाव साधला.