नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानूसार विदर्भातील आर्थिकदृष्टया गरजु रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने नागपूर येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालय, हैद्राबाद हाऊस येथे बॅरेक क्रमांक ९ मध्ये हा कक्ष कार्यान्वित झाला आहे.

हा कक्ष कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत शासकीय सुट्टया वगळून सुरु राहील. विदर्भातील ११ जिल्ह्यासाठी या कक्षातून कामकाज पाहिल्या जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारे याचे काम केले जाणार आहे.

गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ सुलभतेने मिळावा व अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्णांना मुंबई येथे जाण्याची गरज पडू नये म्हणून हा कक्ष आपली जबाबदारी पूर्ण करेल.

उद्घाटन समारंभास पद्मश्री डॉ. विकास महात्मे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आशा पठाण, सुनिल मित्रा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय कक्षाचे सदस्य सचिव तथा कक्ष प्रमुख डॉ. सागर पांडे, जॉन अनभोरे, नम्रता लिलारिया, अभिषेक अग्णे आदी उपस्थित होते.