चंद्रपूर : महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघाने १४ महिन्यात तीन हजाराहून अधिक किलोमीटरचे अंतर पार केले होते. त्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील वाघ तब्बल दोन हजार किलोमीटरचे अंतर पार करून ओडिशात पोहोचला आहे. विशेष म्हणजे, या वाघाला ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वाघांचे स्थलांतरण, त्यांचा कॉरिडॉर आणि सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातील महेंद्र परिवनक्षेत्रात हा वाघ वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिसला. तो नवीन असल्याचे त्यांना जाणवल्याने त्यांनी वाघाची छायाचित्रे व इतर तपशील डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेला पाठवले. संस्थेच्या वैज्ञानिकांनी ओडिशातील या वाघाच्या प्रतिमा इतर वाघांशी जुळवून पाहिल्या. त्यानंतर त्यांना हा वाघ महाराष्ट्रातील ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील असल्याचे आढळले. या वाघाने दोन हजार किलोमीटरचा पल्ला गाठताना चार राज्ये पालथी घातली. तर या प्रवासादरम्यान त्याने नदीनाले, शेत, महामार्ग आदी पार केले. या भागात वाघ पहिल्यांदाच दिसल्याने, त्यांनी वाघाची छायाचित्रे आणि इतर तपशील भारतीय वन्यजीव संस्थेकडे पाठवून त्याचा मूळ प्रदेश शोधला. महाराष्ट्रात यापूर्वी ‘वॉकर’ नावाने प्रसिद्ध झालेल्या वाघाने १४ महिन्यात तीन हजाराहून अधिक किलोमीटरचे अंतर गाठले. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वरमधील हा वाघ नंतर ज्ञानगंगात स्थिरावला. मात्र, आता या वाघाचा काहीच थांगपत्ता नाही. दरम्यान, ओडिशात स्थलांतरित झालेल्या या वाघाबाबत ताडोबाचे क्षेत्रसंचालक जितेंद्र रामगावकर व ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही.
हेही वाचा >>>अमरावती : चंद्रकांत पाटलांच्या बैठकीमुळे कामाकरिता महापालिकेत आलेल्यांना बाहेर काढले!
यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर कोंढाळी भागातील ‘नवाब’ वाघ अनुक्रमे १०० व १३० किमी प्रवास करून अमरावती जिल्ह्यातील पोहरा मालखेड राखीव जंगलात आला. उमरेड-करांडला अभयारण्यातील ‘बली’ नावाच्या वाघाने सुमारे १५० किलोमीटरहून अधिक एरियल अंतर पार करत मानसिंगदेव अभयारण्य गाठले. नागझिरा अभयारण्यातील अल्फा, जय या वाघांनी देखील स्थलांतरण केले आहे.