गडचिरोली : मोह टोळाच्या वेचणीकरता जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने ठार केले. ही घटना पाेर्ला वनपरिक्षेत्राच्या देलाेडा (ता. आरमोरी) जंगलात ५ जून रोजी सकाळी दहा वाजता घडली. मीरा आत्माराम कोवे (५५,रा. सुवर्णनगर, देलोडा ) असे मृत महिलेचे नाव आहे.

मीरा कोवे या सकाळी दहा वाजताच्या सुमारास जेवण करून गावाला लागून असलेल्या जंगलातील कक्ष क्र.(१०) मध्ये टोळी वेचण्यासाठी गेल्या होत्या. टोळी वेचण्यात त्या मग्न असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. पोर्ला ते वडधा मार्गावरून ये -जा करणाऱ्या नागरिकांना वाघाचे दर्शन झाले तेव्हा बराच वेळ उलटूनसुद्धा महिला घरी परत आली नाही म्हणून कुटुंबाला संशय आला. जंगल परिसरात दुपारी चार वाजताच्या सुमारास शोधाशोध सुरु केली असता मीरा कोवे यांचा मृतदेह आढळून आला. वनविभागाने पंचनामा करुन मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पती, दोन मुलांच्या मृत्यूनंतर एकट्याच ओढत होत्या संसार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीरा कोवे यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले होते. चार वर्षांपूर्वी मोठ्या मुलाचा आजारपणात मृत्यू झाला, तर दोन वर्षांपूर्वी धाकट्या अविवाहित मुलानेही आजारपणात प्राण सोडले. मीरा कोवे या सून व दोन लहान नाती यांच्यासह राहत. जेमतेम दीड एकर शेतीवर त्यांची गुजराण होती. त्यामुळे पती, दोन मुलांच्या जाण्याचे दु:ख पचवत त्या मोलमजुरी व हंगामात मोहफुले, मोह टोळी वेचणी करुन कुटुंबाचा गाडा हाकत होत्या.

चालू वर्षातील दुसरी घटना

चालू वर्षी चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै.) येथे मार्च २०२५ मध्ये वाघाने एका पुरुषाचा बळी घेतला होता. देलोडा जंगलात मीरा कोवे यांनाही वाघाच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले. चालू वर्षातील व्याघ्रबळीची ही दुसरी घटना आहे.